उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओढा महानगराकडे

By Admin | Updated: May 3, 2015 00:00 IST2015-05-03T00:00:56+5:302015-05-03T00:00:56+5:30

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे स्थलांतर होण्याची अनेक कारणे असली तरी मोठ्या शहरात व नामांकित शैक्षणिक संस्थेत ...

The students of the Lagaan metropolis for higher education | उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओढा महानगराकडे

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओढा महानगराकडे

विद्यार्थ्यांचे स्थलांतरण : नामवंत शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी धडपड, ग्रामीण भागात विद्यार्थीच मिळेना
पुसद : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे स्थलांतर होण्याची अनेक कारणे असली तरी मोठ्या शहरात व नामांकित शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्याची ‘क्रेझ’ हे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. पुसद परिसरातून दरवर्षी नांदेड, लातूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोटा या व इतर ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्थलांतर होत असते.
दहावी, बारावीनंतर पुढे उच्च शिक्षणासाठी कुठे जायचे, याची घरोघर चर्चा होत असते. कोणत्या संस्थेत प्रवेश घ्यावयाचा याचा सर्वच अंगानी विचार केला जातो. यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेण्याची क्रेझ असतेच. शिवाय केंद्रीय प्रवेश पद्धतीमुळे कुठे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे इतर अनेक पर्यायांचा विचार करून ठेवणे भाग पडते. त्याचप्रमाणे काही कोर्सेस आपल्या भागात नसल्यानेही बाहेरगावचे महाविद्यालय निवडले जाते. संस्थेच्या माहितीपत्रकावरून तेथील वातावरण, मिळणाऱ्या सुविधा यांची भुरळही विद्यार्थ्यांना पडते. शिवाय आयआयटी, सीईटी, आय सेट आदी प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणारे क्लासेसही मोठ्या शहरात असल्याचा परिणामही स्थलांतर होण्यावर होतो.
इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी आर्कुटचा वापर करतात. तेव्हा इतर मित्र त्यांना विविध संस्थांची व तेथील वातावरणाची माहिती देतात. त्यातून तीन-चार व पाच तारांकित शैक्षणिक संस्थांची माहिती त्यांना मिळते. कोणती संस्था योग्य आहे अथवा नाही हे देखील कळते. आपले मित्र, मैत्रिणी तेथे शिकत आहेत. आपणही तेथे जावे, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. घरी आई-वडिलांना ते या बाबत माहिती देतात. संस्थेची निवड करताना त्या ठिकाणी किती व कोणत्या कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येतात याचीही चौकशी केली जाते.
विविध शैक्षणिक संस्था प्रोफेशनल झाल्या आहेत. आपल्या संस्थेची जाहिरात करताना त्या मार्केटींग तंत्राचा वापर करतात. त्याचाही प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत असतो. उच्च शिक्षणासाठी मुले बाहेरगावी जाण्याचे त्यानंतर तिकडेच एखाद्या कंपनीत नोकरीला लागण्याचे प्रमाण वाढत आहे. तालुक्याच्या ठिकाणी स्वत:चे घर झालेले असल्याने आई-वडील आपल्या गावी राहणेच पसंत करतात. घर सोडून राहिल्यामुळे मुलांची निर्णयक्षमता वाढत असली तरी ज्या वयात मुलांना आईवडिलांच्या भावनिक आधाराची गरज असते त्या वयातच ते दूर जातात. आई-वडिलांनाही एकटेपणा जाणवतो. यातच वानप्रस्थाश्रम लवकर स्वीकारावा लागत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. एकंदरीत उच्च शिक्षणासाठी मेट्रो सिटीत जाण्याची क्रेझ तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागली आहे, हे तितकेच खरे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The students of the Lagaan metropolis for higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.