कळंबच्या शाळेत आमदारांची धडक
By Admin | Updated: December 22, 2016 00:09 IST2016-12-22T00:09:05+5:302016-12-22T00:09:05+5:30
येथील जिल्हा परिषद बेसिक शाळेला आमदार डॉ.अशोक उईके यांनी बुधवारी आकस्मिक भेट दिली.

कळंबच्या शाळेत आमदारांची धडक
कळंब : येथील जिल्हा परिषद बेसिक शाळेला आमदार डॉ.अशोक उईके यांनी बुधवारी आकस्मिक भेट दिली. शालेय पोषण आहाराच्या धान्याची त्यांनी तपासणी केली. रजिष्टरमधील नोंदी अद्यावत नसल्याचे आढळून आले. शिजविलेल्या पोषण आहाराची चव घेऊन पालेभाज्या आणि तेल कमी असण्याविषयी जाब विचारला. शाळा परिसरातील नळातून पाणी गळती होत होती. नळाजवळ अन्न सांडलेले होते. याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याध्यापिका गैरहजर होत्या. त्या बैठकीला गेल्याचे इतर शिक्षकांनी सांगितले. शिक्षकांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावे, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.
‘बीआरसी’त शुकशुकाट
बेसिक शाळेच्या परिसरातच असलेल्या गट संसाधन केंद्रालाही (बीआरसी) आमदार डॉ.अशोक उईके यांनी भेट दिली. कॉम्प्युटर आॅपरेटर व्यतिरिक्त एकही कर्मचारी तेथे आढळून आला नाही. याविषयी डॉ.उईके ंयांनी थेट गटशिक्षणाधिकारी एम.बी. सोयाम यांच्याशी संपर्क साधला. परंतु ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे आमदारांनी नाराजी व्यक्त करत कामकाज सुधारण्याची समज दिली. नजीकच्या काही दिवसांपासून येथे नेहमीच असा प्रकार होत असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे आमदार चांगलेच भडकले. आमदारांच्या भेटीनंतर शाळा आणि बीआरसीच्या कारभारात सुधारणेची अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)