विद्यार्थ्यांच्या अन्नत्यागाने वसतिगृहाचे धिंडवडे
By Admin | Updated: December 7, 2015 06:13 IST2015-12-07T06:13:33+5:302015-12-07T06:13:33+5:30
येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये जेवण, निवास, शैक्षणिक साहित्य यासह अनेक मागण्या घेऊन

विद्यार्थ्यांच्या अन्नत्यागाने वसतिगृहाचे धिंडवडे
उमरखेड : येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये जेवण, निवास, शैक्षणिक साहित्य यासह अनेक मागण्या घेऊन वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात एकूण ७५ विद्यार्थी आहेत. त्यांना झोपण्यासाठी गाद्या नाहीत. यावर्षी शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यांना रोज निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे, रात्री विद्युत पुरवठा खंडीत होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारातच राहावे लागत आहे. अंधारामुळे अभ्यास करणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. संगणकसंच पूर्णपणे बंद आहेत. शौचालय ना दुरूस्त आहेत. यासह अनेक समस्यांचा डोंगर वसतिगृहातील विद्यार्थ्यांपुढे उभा आहे. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा लेखी निवेदने दिली, परंतु त्यांच्या मागण्यांकडे समाज कल्याण विभागाकडून सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेवटी रविवारी सकाळपासून वसतिगृहाच्या सर्व विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या अन्नत्याग आंदोलनाची माहिती मिळताच अनिल काळबांडे, सुधाकर लोमटे, प्रेम हनवते, रवी रुडे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले नाही. ज्ञानेश्वर साकळे, अंकुश गायकवाड, मंगेश शिरपुडवार, कपिल वाघमारे, अभय खानझोडे, सुधीर जाधव, वैभव आडे, चंद्रकांत पायकोटे, प्रकाश जोगदंड, आशीष मोरे, कपिल भुसाळे, अतुल पवार, राहुल चिरंगे यासह वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले. वसतिगृहातील खराब गाद्या बाहेर आणून टाकल्या. त्याचबरोबर मिळत असलेली खराब फळे विद्यार्थ्यांनी बाहेर आणून फेकूण दिली. वसतिगृह अधीक्षकांसह जेवणाच्या कंत्राटदाराविरुद्ध विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करीत आंदोलन सुरू ठेवले.
या सर्व प्रकाराची माहिती मिळताच भीम टायगर संघटनेचे अध्यक्ष शंकर शेळके यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतील. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून समस्या प्रलंबित असल्यामुळे आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. त्यानंतर आमदार नजरधने यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून, समस्या ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी समाज कल्याण अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवर संवाद साधला. समस्यांचा तत्काळ निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु विद्यार्थी मात्र आक्रमक भूमिकेत होते. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, भाजपा शहराध्यक्ष नितीन भुतडा, इरफान कुंदन, अनिल शेखे, नदीम नवाब, आदेश जैन यासह समाज कल्याण विभागाचे जे.बी. धोटे, आर.बी. राऊत, पराग केळकर, एम.एम. मेंढे इत्यादी उपस्थित होते. परंतु वृत्त लिहीपर्यंत विद्यार्थ्यांच्या समस्येवर तोडगा निघाला नव्हता. (शहर प्रतिनिधी)
आमदारांनी धरले धारेवर
४शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे आमदार राजेंद्र नजरधने यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. ज्याठिकाणी वसतिगृहातील मुले राहतात, जेवतात त्याठिकाणपेक्षा गुरांचा गोठा चांगला आहे. विद्यार्थ्यांना जेवणाच्या कंत्राटदाराकडून धमकावले जाणे ही बाब गंभीर आहे. उमरखेडच्या शासकीय वसतिगृहातील समस्या तत्काळ निकाली काढा, अन्यथा मला कठोर कारवाई करावी लागेल असे आमदारांनी समाज कल्याण अधिकारी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना खडसावले.
विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली
४वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. तीन विद्यार्थी चक्कर येऊन पडले. अभय खानझोडे (१६), भावराव मिटकर (१६), कपिल भुसारे (१८) या तिघांना तत्काळ उमरखेड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.