शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकले वणीचे विद्यार्थी व पालक
By Admin | Updated: July 6, 2016 02:42 IST2016-07-06T02:42:03+5:302016-07-06T02:42:03+5:30
जिल्ह्यातील काही शाळांमध्ये अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर झाला असून वणी येथील १५० विद्यार्थी खासगी

शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकले वणीचे विद्यार्थी व पालक
अकरावी प्रवेश : खासगी बस भाड्याने करून आणला मोर्चा
यवतमाळ : जिल्ह्यातील काही शाळांमध्ये अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीर झाला असून वणी येथील १५० विद्यार्थी खासगी बस भाड्याने करून मंगळवारी यवतमाळच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकले. ११ वी प्रवेशाचा गुंता सोडविण्याची मागणी करणारे एक निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि एपीएम महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. परंतु तेथील प्रवेश क्षमता पूर्ण झाल्याने प्रवेश मिळणे कठीण झाले. आपले शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत असल्याचे पाहून वणी येथील दीडशे विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी एक खासगी बस भाड्याने करून पालकांसह यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. या ठिकाणी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना निवेदन देऊन प्रवेशाचा हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशी मागणी केली. त्यावेळी शिक्षणाधिकारी वंजारी यांनी येत्या १० जुलैपर्यंत या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन विद्यार्थी आणि पालकांना दिले. यावेळी वणी येथील विद्यार्थी स्वप्नील धुर्वे, विकेश पानघाटे, गजानन कोलपेल्लीवार, वैभव डंभारे, भरत शंभरकर, महादेव पिंपळशेंडे, मारोती पाटील, कुमुदिनी खंडाळकर, काजल उमटे, प्रतीक्षा ढोले, धनश्री पाटील, शीतल पिंपळशेंडे, प्रांजली कुचलकर, शुभांगी झाडे, प्रतीक्षा कौरासे, सुनीता निखाडे यांच्यासह सुमारे दीडशे विद्यार्थी व पालक या शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
जिल्ह्यात अकरावी प्रवेशाचा गुंता यावर्षी वाढला नाही. क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी पास झाल्याने सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे महाविद्यालय हवे असल्याने प्रवेशाची समस्या निर्माण झाली. त्यात विज्ञान शाखेच्या प्रवेशाचा गुंता वाढत असल्याचे दिसत आहे. (शहर वार्ताहर)