गोविंदपूरमध्ये विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत
By Admin | Updated: October 17, 2016 01:43 IST2016-10-17T01:43:12+5:302016-10-17T01:43:12+5:30
घाटंजी तालुक्यात आडवळणावर असलेल्या गावांमधील शिक्षणाचा खेळखंडोबा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त करणारा ठरत आहे.

गोविंदपूरमध्ये विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत
शिक्षणाची दैना : एक गुरुजी रजेवर, दुसरे शिक्षक आस्थापना कामात
अब्दुल मतीन पारवा
घाटंजी तालुक्यात आडवळणावर असलेल्या गावांमधील शिक्षणाचा खेळखंडोबा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. कुठल्याही अधिकाऱ्यांची या भागातील शाळांना चुकूनही भेट होत नसल्याने सर्व काही ठीकठाक सुरू आहे. याची परिसीमा म्हणजे चक्क विद्यार्थ्यांना गुरुजींची भूमिका पार पाडावी लागत आहे. या प्रकारात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिसरातील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद शाळेची ही दैना आहे.
या शाळेमध्ये ५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते चौथी अशा चार वर्गाला शिकविण्यासाठी दोन शिक्षक नियुक्त आहे. शिक्षणाची केवळ घोकमपट्टी सुरू आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने या शाळेला भेट दिली असता नियुक्त एकही शिक्षक हजर नव्हता. विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवित होते. एक शिक्षक रजेवर होते, तर दुसरे शिक्षक कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते.
विद्यार्थी शिक्षकाची भूमिका वठवित असेल, ही चांगली गोष्ट आहे. पण शिक्षक नाही म्हणून कसा तरी वर्ग सुरू ठेवायचा यासाठी शिकविण्याचा प्रकार याठिकाणी दिसून आला. एकूणच सदर शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याचे स्पष्ट झाले. शाळांचा शैक्षणिक दर्जा तपासण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांकडे आहे. मात्र संबंधित शाळांचे केंद्र प्रमुखही या परिसरात फिरकत नसल्याचे सांगितले जाते.
राजापेठ शाळेला ४ वाजता कुलूप
पारवा लगतच्या राजापेठ येथील शाळेचा कारभारही अफलातून होता. दुपारी ४.१५ वाजताच या शाळेला कुलूप लागले होते. पहिली ते चौथीपर्यंत वर्ग या शाळेत आहे. शिक्षकांची मनमानी सुरू आहे. सोयीनुसार हजेरी आणि त्याच पद्धतीने शाळेला सुटी देण्याचा प्रकार याठिकाणी सुरू आहे. प्रत्यक्ष ११ ते ५ ही शाळेची वेळ असताना ४.१५ वाजतापूर्वीच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुटी दिल्याचे सांगण्यात आले. या शाळेवर कार्यरत शिक्षक सोयीच्या ठिकाणावरून ये-जा करतात. बस किंवा इतर वाहतुकीची साधने उपलब्ध व्हावी यासाठी शाळा सुटण्याच्या वेळा पाळल्या जात नाही.