राळेगावातून विद्यार्थिनीचे अपहरण
By Admin | Updated: May 31, 2017 00:24 IST2017-05-31T00:24:25+5:302017-05-31T00:24:25+5:30
राळेगाव येथील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राळेगावातून विद्यार्थिनीचे अपहरण
अद्यापही थांगपत्ता नाही : आईने वेषांतर करून एकाला पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राळेगाव येथील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हाही नोंदविला. दरम्यान घरच्या मोबाईलवर संपर्क करून भेटीसाठी बोलाविणाऱ्या युवकाला अपहृत मुलीच्या आईने यवतमाळ बसस्थानकावर सोमवारी दुपारी वेषांतर करून पकडले. मात्र अजूनही मुलीचा थांगपत्ता लागला नाही.
२२ मेच्या रात्री ११ वाजतापासून ही विद्यार्थिनी बेपत्ता झाली. कुटुंबियांनी नातेवाईकांकडे शोध घेऊनही न सापडल्याने अखेर २४ मे रोजी राळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि ३६३ कलमान्वये गुन्हा नोंदविला गेला. सदर विद्यार्थिनीच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असून आई रोजमजुरी करून मुलांचे पालन पोषण करते. अशातच २२ मेच्या रात्रीपासून सदर विद्यार्थिनी बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेऊनही तिचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान तिच्या घरच्या मोबाईल क्रमांकावर यवतमाळातील एका युवकाने संपर्क केला. विद्यार्थिनीच्या आईने संवाद साधला. मात्र तिला ती विद्यार्थिनी समजून त्या युवकाने यवतमाळच्या बसस्थानकावर भेटण्यासाठी बोलविले. आईनेही शक्कल लढवून मुलीचा वेष धारण केला, तोंडाला रुमाल बांधून ती बसस्थानकावर पोहोचली. तत्पूर्वी या सापळ्याबाबत पोलिसांना सूचित करण्यात आल्याने पोलीस कर्मचारीही तेथे हजर होते. तो युवक समोरासमोर येताच त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याने सुरुवातीला आपले नाव महेश असे सांगितले. मात्र पोलिसांच्या प्रसादानंतर त्याची ओळख पटली. महादेव असे या मुलाचे नाव आहे. तो राळेगावातील एका ढाब्यावर काम करतो. त्याला सदर विद्यार्थिनीच्या घरचा नंबर कसा मिळाला, याची चौकशी पोलिसांनी केली असता त्याने ढाब्यावर काम करणाऱ्या मारोती नामक सहकाऱ्याचे व त्याची पत्नी काजल हिचे नाव उघड केले. त्यांनी आपल्याला या विद्यार्थिनीच्या घरचा मोबाईल नंबर दिला, तिला वडील नसल्याची माहिती दिली, त्यामुळे आपण गेल्या अनेक महिन्यांपासून या विद्यार्थिनीवर नजर ठेऊन होतो, असे त्याने पोलिसांना सांगितल्याचे विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र विद्यार्थिनीच्या अपहरणाशी आपला संबंध नसल्याचे तो म्हणाला.
रॅकेट तर सक्रिय नाही ?
मोबाईलवर संपर्क करणारा हा युवक भेटला असला तरी विद्यार्थिनीचा आठवडा लोटूनही अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. राळेगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. राळेगावात गोरगरीब मुलींना टार्गेट बनविणारे एखादे रॅकेट तर सक्रिय नाही ना?, अशी शंका सदर विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. आपल्या अपहृत मुलीचा पोलिसांनी शोध घ्यावा, यासाठी तिचे कुटुंबीय जिल्हा पोलीस अधीक्षक व महानिरीक्षकांनाही प्रत्यक्ष भेटून साकडे घालणार असल्याचे सांगण्यात आले.