निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
By सुरेंद्र राऊत | Updated: May 5, 2025 23:05 IST2025-05-05T23:04:48+5:302025-05-05T23:05:12+5:30
Yavatmal News: भावाने निकाल काय लागला हे घरी येऊन सांगताे म्हटले. यावरून आपण नापास तर झालाे नाही ना, अशी भीती मनात धरून घरी एकटी असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साेमवारी दुपारी एक वाजता घडली.

निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
- सुरेंद्र राऊत
यवतमाळ - इयत्ता बारावीचा निकाल लागला. याची प्रत्येक विद्यार्थ्याला उत्सुकता हाेती. तालुक्यातील पांढुर्णा येथीस विद्यार्थिनीने बाहेरगावी गेलेल्या भावाला तिचा निकाल विचारला. भावाने निकाल काय लागला हे घरी येऊन सांगताे म्हटले. यावरून आपण नापास तर झालाे नाही ना, अशी भीती मनात धरून घरी एकटी असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साेमवारी दुपारी एक वाजता घडली.
हिना ज्ञानेश्वर आडे (१८, रा. पांढुर्णा पिंपरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. हिना ही नेर येथील दी इंग्लिश स्कूलमध्ये बारावीला हाेती. तिच्याकडे माेबाइल नसल्याने तिने भावाला निकाल काय लागला, याची विचारणा केली. त्यावेळी ताे बाहेरगावी हाेता. हिना घरी एकटीच हाेती. भावाने तिचा निकाल बघितला. तिला ४७ टक्के गुण मिळाले हाेते. अतिशय कमी गुण मिळाले हे ऐकूण बहीण नाराज हाेईल, म्हणून त्याने हिनाला घरी आल्यावरच निकाल सांगताे, असे उत्तर दिले.
यावरून हिनाने आपण नापास झालाे, अशी समजूत करून घेत गळफास लावून आत्महत्या केली. भाऊ दुपारी घरी परत आल्यानंतर त्याला हे दृश्य दिसले. हिनाचा भाऊ जयकुमार ज्ञानेश्वर आडे याच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नाेंद केल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पाेलिसांनी दिली.