एसटीच्या संकटकालीन खिडकीतून पडला चिमुकला

By Admin | Updated: May 8, 2015 00:12 IST2015-05-08T00:12:31+5:302015-05-08T00:12:31+5:30

दुपारचे रणरणते उन्ह. घाटातील एका वळणावर चिमुकला ओक्साबोक्सी रडत होता.

Stuck out of ST's crisis window | एसटीच्या संकटकालीन खिडकीतून पडला चिमुकला

एसटीच्या संकटकालीन खिडकीतून पडला चिमुकला

प्रकाश लामणे पुसद
दुपारचे रणरणते उन्ह. घाटातील एका वळणावर चिमुकला ओक्साबोक्सी रडत होता. तेवढ्यात पुसदचे तिघे जण इंडिका कारने तेथे पोहोचले. चिमुकल्याची चौकशी केली. एसटीच्या संकटकालीन खिडकीतून पडल्याचे चिमुकल्याने सांगताच तिघेही आश्चर्यचकित झाले. किरकोळ दुखापत झालेल्या चिमुकल्याला आपल्या कारमध्ये घेऊन त्या तिघांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. दारव्हापर्यंत पोहोचलेल्या आई-वडिलांना परत बोलावून चिमुकला त्यांच्या हवाली करण्यात आला. पुसदचे ते तिघे तरुण चिमुकल्यासाठी देवदूतच ठरले.
चंद्रपूर जिल्ह्यातील दर्यापूर येथील एक परिवार बुधवारी दुपारी चंद्रपूर-वाशिम बसने प्रवास करीत होता. यवतमाळवरून बस सुटली. त्यावेळी या बसमध्ये चालक-वाहक आणि चंद्रपूर येथील विजय भगत, त्यांची पत्नी आणि चार वर्षीय मुलगा आतिष उर्फ हर्षल होता. काही वेळातच वाहकाला झोप लागली. पाठोपाठ त्याचे आई-वडीलही डुलक्या द्यायला लागले. बस उमर्डा नर्सरी घाटातून जात होती. खेळता खेळता आतिष बसच्या मागच्या सिटवर गेला. उत्सुकता म्हणून उघड्या असलेल्या संकटकालीन खिडकीतून वाकून पाहिले. त्याचवेळी खड्यातून उसळलेल्या बसमधून आतिष बसच्या बाहेर फेकला गेला. कुणालाही खबरबात नाही.
रस्त्यावर कोसळलेल्या आतिषच्या हनुवटीजवळ किरकोळ दुखापत झाली. त्या ठिकाणी एकटाच ओक्साबोक्सी रडत होता. एक दोन जण त्याच्या जवळ गोळाही झाले. मात्र त्याची विचारपूस करण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. तेवढ्यात पुसद येथील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश पेंशनवार, विश्वजित सरनाईक आणि संजय तुते त्या ठिकाणी आपल्या कारने पोहोचले. रडत असणाऱ्या मुलाची चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितलेला धक्कादायक प्रकार ऐकून तेही अवाक् झाले. त्या मुलाला घेऊन पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान चंद्रपूर-वाशिम बस दारव्हा बस स्थानकावर पोहोचली. त्याठिकाणी विजयला मुलगा दिसला नाही. त्याची घाबरगुंडी उडाली. पत्नीसह दारव्हा पोलीस ठाणे गाठले. इकडे आतिषच्या सांगण्यावरून पोलिसांनी सर्वत्र वायलेसवरून मॅसेज दिले. हा मॅसेज दारव्हा पोलीस ठाण्यातही पोहोचला होता. आपला मुलगा यवतमाळात सुखरुप असल्याचे पाहून जीव भांड्यात पडला. या दोघांनी दारव्हा येथून सरळ यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. चिमुकल्याला आपल्या ताब्यात घेतले. आई-वडिलांच्या एका डुलकीने मुलाचे बरेवाईट झाले असते. मात्र दैव बलवत्तर ठरले.

Web Title: Stuck out of ST's crisis window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.