एसटीच्या नवीन ट्रायमॅक्सची बॅटरी ‘फेल’
By Admin | Updated: April 29, 2016 02:35 IST2016-04-29T02:35:10+5:302016-04-29T02:35:10+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) नवनवीन प्रयोग राबविले जात आहे. मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना विविध समस्या निर्माण होत आहे.

एसटीच्या नवीन ट्रायमॅक्सची बॅटरी ‘फेल’
रस्त्यात करावा लागतो मुक्काम : ‘येरे माझ्या मागल्या’ची प्रचिती, ट्रेमधून द्याव्या लागतात तिकीट
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) नवनवीन प्रयोग राबविले जात आहे. मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना विविध समस्या निर्माण होत आहे. याचा त्रास प्रवाशांसोबतच कामगारांनाही सहन करावा लागत आहे. प्रवाशांना तिकीट देण्यासाठी दाखल झालेल्या नवीन ट्रायमॅक्स मशीन यातीलच एक आहे.
नवीन विमा योजनेसाठी महामंडळाने प्रत्येक तिकीटामागे एक रुपया जादा घेणे सुरू केले आहे. त्यामुळे प्रवाशांना दोन तिकीट द्याव्या लागत होत्या. यामुळे वाहकांपुढे निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी नवीन मशीन दाखल झाल्या आहे. ही मशीन वापरण्यासाठी सुटसुटीत नाही, अशी वाहकांची ओरड आहे. दुसरी बाब म्हणजे या मशीनमध्ये वापरण्यात आलेली बॅटरी जास्तीत जास्त दोन तास चालते. त्यामुळे पुढील प्रवासात प्रवाशांना तिकीट देण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी काही बसच्या वाहकांनी मार्गात सोय असेल त्या ठिकाणी बस उभ्या करून
बॅटरी चार्जिंग केल्याचे प्रकार घडले आहे.
मशीन बंद पडल्यास तिकीट ट्रेचा वापर करता येतो. मात्र ज्या उद्देशाने ट्रे बंद करण्यात आले, तीच बाब वाहकांना पुन्हा करावी लागत आहे. एकूणच ‘येरे माझ्या मागल्या’ असा प्रकार होत आहे.
नवीन मशीन अधिकाधिक वेळ चालावी यासाठी प्रभावी पर्याय द्यावा, अशी अपेक्षा वाहकांकडून व्यक्त होत आहे. तसेच झाल्यास बसमधील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. या दृष्टीने महामंडळाने विचार करावा अशी मागणी आहे. (वार्ताहर)