एसटीच्या मनमानीने विद्यार्थिनी त्रस्त
By Admin | Updated: February 28, 2016 02:36 IST2016-02-28T02:36:50+5:302016-02-28T02:36:50+5:30
मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना शाळेपर्यंत आणण्यासाठी आणि त्यांना गावात सोडण्यासाठी बसफेऱ्या सुरू करण्या आलेल्या आहेत.

एसटीच्या मनमानीने विद्यार्थिनी त्रस्त
घाटंजी : मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना शाळेपर्यंत आणण्यासाठी आणि त्यांना गावात सोडण्यासाठी बसफेऱ्या सुरू करण्या आलेल्या आहेत. मात्र अशा बसवरील काही चालक-वाहकांच्या मनमानीमुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसेस काही मार्गावर धावत नसल्याची ओरड आहे.
घाटंजी तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत काही गावांसाठी बसफेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहे. यात काही चालक-वाहकांकडून चालढकल केली जात आहे. असाच प्रकार शुक्रवारी घडला. विद्यार्थिनींसाठी ६०७८ या क्रमांकांची १७९ ही शेड्युल बस घाटंजी-पारवा-गणोरी या गावासाठी सोडण्यात आली. सदर बस घाटंजी येथे पंक्चर झाली. या बसवर असलेल्या चालक आणि वाहकांनी पंक्चर दुरूस्त केला. या कामात तत्परता दाखविली. पण बस गणेरीसाठी नेण्याचे टाळण्यात आले. सकाळी ९ वाजताची बस गावात येईल या प्रतीक्षेत विद्यार्थिनी होत्या. वेळ होऊनही बस आली नसल्याने काही विद्यार्थिनींनी इतर साधनांव्दारे शाळा जवळ केली तर काही विद्यार्थिनी घरी परत गेल्या.
बस दुरूस्त झाल्यानंतरही चालक आणि वाहकांनी गणेरीसाठी बस नेणे का टाळले, हा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. तालुक्यातील विविध गावांसाठी सोडल्या जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या बससंदर्भात चालढकल केली जात असल्याने शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे अशा चालक-वाहकांवर कारवाई करावी अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)