वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

By Admin | Updated: August 3, 2014 23:37 IST2014-08-03T23:37:48+5:302014-08-03T23:37:48+5:30

एरव्ही वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या रोषाला वीज वितरणचे कर्मचारी बळी पडतात. मात्र यवतमाळातील भोसा नाका परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांना

Strike of power distribution employees | वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

गुन्हा दाखल : भोसा नाका परिसरातील घटना
यवतमाळ : एरव्ही वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या रोषाला वीज वितरणचे कर्मचारी बळी पडतात. मात्र यवतमाळातील भोसा नाका परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील भोसा नाका परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या प्रकरणाची तक्रार वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली. तक्रार निवारण केंद्र क्र. ५ मध्ये कार्यरत वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ तंत्रज्ञ राहूल माणिक नारनवरे, योगेश सूर्यवंशी आणि वीज सहायक रामेश्वर सर्जे भोसा नाका परिसरात गेले. मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू करीत होते. त्यावेळी परिसरातील काही जणांनी या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. तक्रार दिल्यानंतर एवढ्या उशिरा कसे आले, तुम्ही काम करीत नाही असा आरोप केला. यावेळी कर्मचाऱ्यांसोबत हातापायी सुरू झाली. कर्मचाऱ्यांवर काही जण धावून आले.
वादात या कर्मचाऱ्यांना जेली अजगर, आदील, शहेजाद रा. इंदिरानगर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील कपडेही फाडले. या प्रकरणी राहूल नारनवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या मारहाणीच्या घटनेचा निषेध एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, तांत्रिक कामगार युनियन, एसीई आणि इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दोषींवर कडक कारवाई करून कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी वर्कर्स फेडरेशनचे पदाधिकारी डी.बी. दहेलकर, आर.के. गुल्हाने, एम.एल. वेळूकर, दीपक मिसाळ, रितेश सव्वालाखे, रवाळे, जयस्वाल यांनी केली आहे. या घटनेने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यात तीव्र असंतोष पसरला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Strike of power distribution employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.