मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव
By Admin | Updated: March 7, 2017 01:28 IST2017-03-07T01:28:11+5:302017-03-07T01:28:11+5:30
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव आहे. वाढत्या तणावामुळे मनुष्य रुग्ण होत आहे. मनुष्याचे ८५ टक्के आजार मनाच्या कमजोरीमुळे होतात.

मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव
प्रभा मिश्रा : पुसद येथे आध्यात्मिक शिबिराला भाविकांचा प्रतिसाद
पुसद : मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव आहे. वाढत्या तणावामुळे मनुष्य रुग्ण होत आहे. मनुष्याचे ८५ टक्के आजार मनाच्या कमजोरीमुळे होतात. आपण सकारात्मक विचार केल्यास आजारी पडणारच नाही. व्यक्ती २४ तासात ३० ते ४० हजारवेळा विचार करतो. जास्त वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा पद्धतीमुळे सकारात्मक विचार कमी होतात व आपल्या जवळचे लोकही सुटून जातात, असे प्रतिपादन डॉ.प्रभा मिश्रा यांनी केले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पुसद केंद्राच्यावतीने आयोजित आध्यात्मिक शिबिरात ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभादिदी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपली आजची जीवनशैली अतिशय जलद झाली असून यावर आपले नियंत्रण नसल्यास तणावात वाढ होईल. आपण इतरांशी खूप बोलतो. परंतु स्वत:सोबत संवाद साधत नाही. पर्यटनस्थळावर जाण्याने सुख मिळणार नाही. यासाठी स्वत:मध्ये झाकून पाहावे लागेल. आपल्यातील क्षमता असिम आहे. मनुष्य शक्तिमान आहे. त्या शक्तीला समजून घेऊन त्याचा उपभोग केला पाहिजे. अहम्भाव बाजूला सारता आला पाहिजे. खोटा अहंकार दाखवू नये व खोटा दिखावा करू नये. यामुळेही तणावात वाढ होते, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. (तालुका प्रतिनिधी)