कळंब शहरात मूर्ती विटंबनेनंतर तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST2019-12-27T06:00:00+5:302019-12-27T06:00:12+5:30
विटंबनेचा प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात आला. यानंतर चौकाचौकात नागरिक एकत्र येऊ लागले. सकाळी १० वाजताच्या दरम्यान येथील शहीद स्मारकाजवळ युवकांसह हजारो नागरिक जमा झाले. त्यानंतर रॅली काढण्यात आली. दरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याची विनंती व्यापाऱ्यांना करण्यात आली.

कळंब शहरात मूर्ती विटंबनेनंतर तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शहरातील कोलाम पोड पारवेकर नगरामध्ये असलेल्या हनुमान मूर्तीची तोडफोड झाल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. त्यामुळे शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असून निषेध म्हणून बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
विटंबनेचा प्रकार सकाळी नागरिकांच्या लक्षात आला. यानंतर चौकाचौकात नागरिक एकत्र येऊ लागले. सकाळी १० वाजताच्या दरम्यान येथील शहीद स्मारकाजवळ युवकांसह हजारो नागरिक जमा झाले. त्यानंतर रॅली काढण्यात आली. दरम्यान संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याची विनंती व्यापाऱ्यांना करण्यात आली. व्यापाऱ्यांनी घटनेचा निषेध म्हणून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. त्यानंतर हजारो नागरिकांचा जमाव पोलीस ठाण्यावर धावून गेला. या घटनेमध्ये दोषी असणाºया लोकांना तत्काळ गजाआड करण्याची मागणी जमावाकडून करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त मागविला. सोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर या तातडीने कळंब येथे पोहोचल्या. त्यांनी संपूर्ण सूत्रे हाती घेत जमावाला शांत केले. येत्या तीन दिवसात या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना जेरबंद करू या आश्वासनावर जमाव शांत झाला. सध्या कळंब शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष ठरले कारणीभूत
संबंधित जागा दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दोन समाजातील नागरिकांनी या जागेवर हक्क सांगितला. त्यामुळे मागील अनेक वर्ष या जागेला सील होते. दोन समाजातील तेढ सोडविणे ही महसूल, नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती. परंतु या तीनही यंत्रणेने या जागेसंबंधी तोडगा काढण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही.