खाकीवर्दीची ताकद उमरखेडमध्ये एकवटली

By Admin | Updated: October 13, 2016 00:38 IST2016-10-13T00:38:36+5:302016-10-13T00:38:36+5:30

गणेशोत्सवातील गालबोट लागल्याच्या घटनेचा अनुभव पाठीशी असल्याने दुर्गोत्सवात जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रचंड खबरदारी घेतली आहे.

The strength of khakivardi assorted in Umkhed | खाकीवर्दीची ताकद उमरखेडमध्ये एकवटली

खाकीवर्दीची ताकद उमरखेडमध्ये एकवटली

दुर्गा विसर्जन : एसपी, अ‍ॅडिशनलचा मुक्काम, होम साहेबांसह सर्वच तैनात, तगडा बंदोबस्त
यवतमाळ : गणेशोत्सवातील गालबोट लागल्याच्या घटनेचा अनुभव पाठीशी असल्याने दुर्गोत्सवात जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रचंड खबरदारी घेतली आहे. पोलीस दलाची प्रमुख शक्ती उमरखेडमध्ये एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
उमरखेड येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. शहरात प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह मंगळवारपासून उमरखेडमध्ये तळ ठोकून आहे. दसऱ्याचा सणही त्यांनी उमरखेडातच साजरा केला. त्यांच्या दिमतीला अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गृह पोलीस उपअधीक्षक तामगाडगे यांच्या नेतृत्वातील फौज तैनात आहे. जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण लक्षच उमरखेडवर केंद्रित केले. गणेशोत्सवाची पुनरावृत्ती दुर्गोत्सवात होवू नये, या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये अन्य संवेदनशील ठिकाणांची जबाबदारी ठाणेदार व तेथील एसडीपीओंकडेच सोपविण्यात आली आहे.
राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलीस महासंचालक यादव यांना स्वत: स्थितीचा आढावा घेण्यासाठी दुर्गोत्सवापूर्वी उमरखेडला यावे लागले. यावरून उमरखेडच्या घटनेची तीव्रता महासंचालक कार्यालयापर्यंत धडकल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच दुर्गा विसर्जनाच्यावेळी बंदोबस्तात कोणतीही कमी राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली.
(जिल्हा प्रतिनिधी)

महासंचालकांची व्यूहरचना उमरखेडमुळे फेल
राज्यात सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडला असताना केवळ उमरखेडमुळे या उत्सवाला गालबोट लागले. यंदा कोणत्याही गालबोटाशिवाय गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याची पोलीस महासंचालक सतीश माथूर यांची व्यूहरचना उमरखेडच्या घटनेमुळे फेल ठरली.

Web Title: The strength of khakivardi assorted in Umkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.