रेशन दुकानावरून दोन गटांत तुफान हाणामारी
By Admin | Updated: September 10, 2016 00:44 IST2016-09-10T00:44:19+5:302016-09-10T00:44:19+5:30
स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीवरुन पुसद तालुक्यातील जगापूर येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

रेशन दुकानावरून दोन गटांत तुफान हाणामारी
३३ जणांवर गुन्हा : पुसद तालुक्यातील घटना
मुळावा : स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीवरुन पुसद तालुक्यातील जगापूर येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी दोनही गटातील ३३ जणांविरुद्ध विविध कलमांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.
पोफाळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जगापूर येथे बाळासाहेब शामराव देशमुख यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान आहे. लाभार्थ्याना माल मिळत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी पुसद तहसीलकडे केली होती. त्यावरून पुसद तहसील कार्यालयामार्फत शुक्रवारी चौकशी पथक जगापूरमध्ये दाखल झाले. त्यावेळी सरपंच दीपक नारायण पद्मे यांनी दक्षता समिती समोर चौकशी करण्याचे मागणी केली. यावरूनच दोन गटात शाब्दीक वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसान तुफान हाणामारीत झाले.
या प्रकरणी सरपंच दीपक नारायण पद्मे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळासाहेब शामराव देशमुख व इतर २४ लोकांवर विविध कलमांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बाळासाहेब देशमुख यांच्या तक्रारीवरून सरपंच दीपक नारायण पद्मे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार एल.डी. तावरे, पोलीस उपनिरीक्षक पी.जी. भोसले अधिक तपास करीत आहे.
स्वस्त धान्य दुकानाचा वाद विकोपाला गेल्याने ही घटना घडली. विशेष म्हणजे यानंतर या ठिकाणी तहसीलच्या पथकाने चौकशी थांबवून तेथून काढता पाय घेतल्याची माहिती आहे. (वार्ताहर)