लासिनात वादळाचे तांडव
By Admin | Updated: June 18, 2017 00:54 IST2017-06-18T00:54:16+5:302017-06-18T00:54:16+5:30
अचानक आलेल्या प्रचंड वादळाने अवघ्या दहा मिनिटाच्या तांडवात संपूर्ण लासीना जणू उद्ध्वस्त केले.

लासिनात वादळाचे तांडव
शेकडो वृक्ष उन्मळले : शंभरावर घरांवरील छत उडाले
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : अचानक आलेल्या प्रचंड वादळाने अवघ्या दहा मिनिटाच्या तांडवात संपूर्ण लासीना जणू उद्ध्वस्त केले. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या या वादळाने अनेकांना उघड्यावर आणले. राज्य मार्गावर वृक्ष उन्मळून पडल्याने यवतमाळ-अमरावती मार्गावरील वाहतूक सहा तास ठप्प होती. तर वीज खांब तुटल्याने संपूर्ण परिसरात अंधार पसरला. या वादळात कुणालाही इजा झाली नसली तरी लाखो रुपयांचे मात्र नुकसान झाले.
यवतमाळ तालुक्यातील लासीना येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रचंड वेगाने वादळ आले. गावकरी सायंकाळच्या जेवणाच्या तयारीत असताना वादळाने घरावरील छप्पर उडून नेले. काही कळायच्या आत हा प्रकार घडल्याने संपूर्ण गावकरी भयभीत झाले. कुणाच्याही घरावर टिनपत्रे राहिले नाही. तर वीज वितरणचे खांब उन्मळून पडल्याने संपूर्ण गाव अंधारात बुडाले. पावसाळी वातावरणात नेमके काय झाले याचाही अंदाज येत नव्हता. रात्री ८ वाजताच्या सुमारास वादळ शांत झाल्यानंतर गाव भूकंप झाल्यासारखे भासत होते. या वादळात अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने रात्र जागून काढावी लागली. त्यातच पाऊसही कोसळत होता. त्यामुळे अनेकांनी लहान मुलांसह शाळा आणि पक्के घर असलेल्या शेजाऱ्यांचा आश्रय घेतला.
दरम्यान या वादळात यवतमाळ-अमरावती राज्यमार्गावरील मोठाली वृक्ष मुळासह उन्महून पडली. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला पाच किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. बांधकाम विभाग, यवतमाळ अग्निशमन दल, महसूल प्रशासन, पोलीस दाखल झाले. तब्बल सहा तासाच्या प्रयत्नानंतर राज्य मार्गावर पडलेली झाडे बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत झाली. या वादळात जीवित हानी झाली नाही. मात्र वादळ काय असते याचा अनुभव अनेकांनी घेतला. लासीना गावाजवळील ढाब्यावर वादळामुळे काही नागरिकांनी आश्रय घेतला होता. परंतु संपूर्ण ढाबाच उद्ध्वस्त झाला. मिळेल त्या ठिकाणी नागरिक आश्रय शोधत होते. लासीना बसस्थानकावर यवतमाळला जाण्यासाठी काही प्रवासी झाडाखाली उभे होते. तेवढ्यात वादळ आले. यामुळे या मंडळींनी सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न चालविला. अवघ्या दोन मिनिटानंतर मोठे झाड उन्मळून पडले. मोठा अनर्थ टळला.
तारावर आणि झाडावर टिनपत्रे
वादळामुळे उडालेली टिनपत्रे दुसऱ्या दिवशीही वीज तारांवर आणि झाडांवर अडकलेल्या अवस्थेत होती. या वादळात पत्त्याप्रमाणे उडालेल्या टिनपत्रे वाकून गेले.
गावात स्मशान शांतता
गुरुवारी रात्री झालेल्या वादळाने उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्याचा प्रयत्न शुक्रवारी गावकरी करीत होते. प्रत्येक घरातील साहित्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती. प्रत्येकजण आपल्या घरावरील उडालेली टिनपत्रे शोधत होते. दुसऱ्या दिवशी गावात कुणाच्याही घरी चूल पेटली नाही तर रात्री ऐन जेवणाच्या वेळी झालेल्या वादळाने अर्धे गाव उपाशीपोटीच जागे होते.
असे झाले नुकसान
लासीना येथील खुशाल राठोड, प्रवीण राठोड, कवडू राठोड, सोमला राठोड, शेषराव राठोड, नरहरी दांडेकर, मधुकर सातगळे, बेबीबाई लांबतुरे, बालाजी मानकर, सूर्यभान कासार, नितीन मोकासे, वसंता बोरकर, भगवान जवळकर, मनोहर तेलतुंबडे, मनोज पेंदोर, रवी मानकर, धनराज घोटेकर, निशिगंधा वेळूकार, सुधाकर डोणेकर, निलेश दुधे यांच्यासह शंभर घरावरील टीनपत्रे उडाली. काहींच्या घराची पडझड झाली तर संजय पिसे यांच्या मालकीचा जय भवानी ढाबा, शालिग्राम चंदेल यांचे अवधूत महाराज हॉटेल या वादळात उद्ध्वस्त झाले.
पाळण्यातला चिमुकला बचावला
लासीना येथील बालाजी मानकर यांच्या टिनपत्र्यातील घराच्या आड्याला पाळणा बांधलेला होता. या पाळण्यात चिमुकला झोपला होता. वादळाला सुरुवात होताच चिमुकल्याला पाळण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले आणि काही क्षणातच संपूर्ण घरावरील छत उडाले.
प्रशासनाची धावपळ
लासीना वादळ झाल्याची माहिती मिळताच यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, लाडखेडचे ठाणेदार नरेश रणवीर, गटविकास अधिकारी मानकर, मंडळ अधिकारी बकाले, तलाठी मेहरे यांनी लासीनाकडे धाव घेतली. सरपंच अलका कांबळे यांच्यासोबत रात्रीच गावाची पाहणी केली. तर दुसरीकडे राज्य मार्गावर पडलेली झाडे जेसीबीच्या मदतीने काढण्यात आली. प्रशासनाने तत्परता दाखविल्याने अवघ्या सहा तासात हा रस्ता वाहतुकीस खुला झाला.