जिल्ह्याला वादळाचा तडाखा
By Admin | Updated: May 12, 2017 00:20 IST2017-05-12T00:20:18+5:302017-05-12T00:20:18+5:30
जिल्ह्यात गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाचा जबर तडाखा बसला. या वादळात अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली ....

जिल्ह्याला वादळाचा तडाखा
अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली : दारव्हा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी पावसाचा जबर तडाखा बसला. या वादळात अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून, मोठमोठाली वृक्ष उन्मळून पडली. दारव्हा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून, यवतमाळ तालुक्यात किटा कापरा येथे वीज कोसळून तरूण ठार झाला. या वादळाने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
यवतमाळ शहरासह काही भागात गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वातावरण निर्माण झाले. दारव्हा, झरी, कळंब, वणी, मारेगाव या तालुक्याला वादळाचा तडाखा बसला. दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे, तिवसा, कामठवाडा, चाणी, चिकणी, आमशेत, दिघोरी यासह अनेक गावात दुपारी वादळाने थैमान घातले. अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेलीत. वडगाव येथील शाळेचे छत पत्त्यासारखे उडून गेले. तर चिकणी येथील ग्रामपंचायत कार्यालयावरील टिनपत्रे उडाली. तिवसा ते बाणायतपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वादळामुळे अनेक वीज खांब वाकले असून, वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. या वादळामुळे पाडाला आलेला आंबा गळून पडला. वादळानंतर प्रत्येक जण नुकसानीचा अंदाज घेताना दिसत होते.
यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा येथे दुपारी ४ वाजता वीज कोसळून योगेश कुंडलिक मुरझडे (२२) हा ठार झाला. तर कवडू तुकाराम रिंगणे (३३) हा गंभीर जखमी झाला. तर कळंब येथील उमेश जुनघरे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळल्याने बैल ठार झाला. वादळी पावसाने नेमके किती नुकसान झाले हे मात्र कळू शकले नाही.
लग्न मंडप उडाला
यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथे गुरुवारी विष्णू भावसिंग राठोड यांचा विवाह सोहळा होता. त्यासाठी घरासमोरील मैदानात विवाह मंडप टाकण्यात आला होता. लग्न आटोपल्यानंतर जेवणाच्या पंगती सुरू होत्या. त्याचवेळी अचानक आलेल्या वादळाने संपूर्ण मंडप उडून गेला. यामुळे वऱ्हाड्यांची त्रेधा उडाली. पंगत अर्ध्यावर सोडून वऱ्हाड्यांना सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली. यात राठोड यांचे मोठे नुकसान झाले.