शहराच्या मध्यवस्तीत स्फोटक पदार्थांचा साठा
By Admin | Updated: March 26, 2015 02:11 IST2015-03-26T02:11:06+5:302015-03-26T02:11:06+5:30
शहरातील मध्य वसाहतीत स्फोटक व ज्वलनशील पदार्थांचे वाहन व साठा असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

शहराच्या मध्यवस्तीत स्फोटक पदार्थांचा साठा
दिग्रस : शहरातील मध्य वसाहतीत स्फोटक व ज्वलनशील पदार्थांचे वाहन व साठा असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. परंतु प्रशासन मात्र या बाबत मूग गिळून बसल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासकीय नियमानुसार स्फोटक ज्वलनशील पदार्थ वसाहतीपासून किमान पाच किलोमीटर अंतरावर असणे अनिवार्य आहे. कारण एखादवेळी स्फोट झाल्यास जीवित व वित्त हानी कमीत कमी प्रमाणात व्हावी हा त्या मागील उद्देश आहे. परंतु या नियमांना डावलून दिग्रस शहरात नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार होत आहे. सध्या उन्हाळा तापायला सुरुवात झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात विहिरींचे खोदकामही सुरू आहे. विहिरीमधील दगड फोडण्यासाठी जे ब्लास्टिंग केल्या जाते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थांचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी स्फोटक पदार्थाची वाहने थांबतात त्यांच्यासमोर आदिवासी मुलांचे वसतिगृह असून केवळ १०० फुटावर सिनेमागृह आहे. बाजूलाच शिवाजी चौक आणि मेन मार्ग आहे. या स्फोटक पदार्थांचा स्फोट झाला तर नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण होवू शकतो. परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांचे स्फोटक पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांसोबत असलेल्या मधूर संबंधातून या सर्व बाबी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मुख्य बाजारपेठेत असलेल्या या स्फोटकांच्या साठ्यामुळे मोठा अपघात घडू शकतो.
एवढ्या गंभीर समस्येकडे अधिकारीवर्ग दुर्लक्ष करीत आहे. स्फोटक पदार्थांची वाहने व हा साठा अतिशय धोकादायक असल्यामुळे प्रशासनाकडून त्वरित कारवाईची अपेक्षा नागरिकांना आहे.
(शहर प्रतिनिधी)
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शहरातील मध्य वसाहतीत स्फोटक व ज्वलनशील पदार्थांच्या साठ्याची वाहते नेहमीच उभी असतात. या ठिकाणी साठाही ठेवलेला असतो. ही बाब परिसरातील नागरिकांना माहित असल्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर त्वरित निर्बंध लावावे, अशी मागणी आहे. उल्लेखनीय म्हणजे शासकीय नियमानुसार असे कुठल्याही ज्वलनशील स्फोटक पदार्थ वसाहतीपासून किमान पाच किलोमीटर अंतरावर सुरक्षितरित्या ठेवलेले असावे, परंतु या नियमांची कोणत्याही प्रकारचे अंमलबजावणी होताना दिसत नाही.