सत्ताधारी शिवसेनेचा आर्णी येथे रास्ता रोको
By Admin | Updated: June 14, 2016 01:50 IST2016-06-14T01:50:10+5:302016-06-14T01:50:10+5:30
राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर पीक कर्जासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असून आर्णी येथे

सत्ताधारी शिवसेनेचा आर्णी येथे रास्ता रोको
आर्णी : राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर पीक कर्जासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असून आर्णी येथे सोमवारी तब्बल अडीच तास रस्ता रोको आंदोलन करून शिवसैनिकांनी आपल्याच शासनाविरोधात रोष व्यक्त केला. या आंदोलनामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा सरसकट लाभ द्यावा, विमा उतरविणारे आणि न उतरविणारे शेतकरी असा भेदभाव करू नये अशी मागणी करीत शिवसेनेच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी १० वाजता यवतमाळ बायपासवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी केले. यावेळी शिवसेनेचे अमोल मंगाम, तालुका प्रमुख रवी राठोड, सरपंच अभिजित शिंदे, राहुल लाभसेटवार, लोणबेहळचे सरपंच उज्वल मोरे, उत्तम राठोड, गुड्डू देठे, रामेश्वर जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांनी भररस्त्यातच ठिय्या दिल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान उपविभागीय अधिकारी विकास माने आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात निखील खारोळ, स्वप्नील साठे, राहुल मुजमुले, पुरुषोत्तम पवार, तुकाराम भागडे, अश्विन जाधव, शिव जाधव, आलासिंग पवार, रवी गायकवाड, रवी राठोड, प्रवीण भाकरे, अशोक कोसरे, तुषार राऊत, राजू भारती, दिलीप नागापुरे, आनंद शिंदे, माधव जाधव, गणेश बोक्से, राजू बुक्कावार, सचिन आत्राम आदी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
विरोध कुणाचा ?
४राज्यात सत्ता असलेल्या शिवसेनेकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसैनिकांना रस्त्यावर उतरावे लागते. यापूर्वी खासदारांनी याच प्रश्नावर विविध बँकांच्या व्यवस्थापकांच्या भेटी घेऊन पीक कर्जासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.