ढाणकीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By Admin | Updated: December 2, 2015 02:46 IST2015-12-02T02:46:52+5:302015-12-02T02:46:52+5:30
सततच्या नापिकीने शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही.

ढाणकीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
वाहतूक विस्कळीत : वीज, पीक विमा, धरणाचे पाणी सोडण्याची मागणी
ढाणकी : सततच्या नापिकीने शेतकरी, शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही. विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ढाणकी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांंनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
ढाणकीचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब चंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात निंगनूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य शांता राठोड, बिटरगावचे शिवशंकर पांढरे, ढाणकीचे पंचायत समिती सदस्य रमेश गायकवाड, ब्राह्मणगावचे जिल्हा परिषद सदस्य परमात्मा गरुडे, पंचायत समिती सदस्य मोहन नाईक, दत्तराव पिलवंड, रेखा मुरमुरे, अश्विनी राठोड यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. ढाणकी येथे जुन्या बसस्थानकाजवळ हा रास्ता रोको करण्यात आला. बाळासाहेब चंंद्रे यांनी या आंदोलनाचे पार्श्वभूमी सांगितली. माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तातू देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश चव्हाण यांनी शेतकरी हितासाठी हा लढा आणखी तीव्र करू असे सांगितले.
शेती पंपाला १६ तास सलग वीज पुरवठा करावा, जळालेल्या डीपी त्वरित बसवाव्या, खरीप हंगामाचा पीक विमा त्वरित मंजूर करावा, गाजेगाव-डोल्हारी रस्त्याचे काम त्वरित करावे, उमरखेड ते खरबी रस्त्याचे काम सुरू करावे, हरदडा-ब्राम्हणगाव-बोरी रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरूवात करावी, ढाणकी येथे १३२ केव्ही वीज वितरण केंद्र सुरू करावे आणि इसापूर धरणातील पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, छबूराव धोपटे, सुभाष कुचेरिया, भास्कर चंद्रे, अजीज खान पठाण, आनंदराव शेवाळकर, कविता कोकुलवार, शे.इब्राहीम शे. जबीर, बशीर भाई यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांंनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. रस्तारोको दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)