घाटंजी तहसील कार्यालयासमोर तलाठ्यांचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: December 13, 2014 22:47 IST2014-12-13T22:47:32+5:302014-12-13T22:47:32+5:30
येथील तहसील कार्यालयासमोर विदर्भ पटवारी संघाच्यावतीने धरणे देण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे.

घाटंजी तहसील कार्यालयासमोर तलाठ्यांचे काम बंद आंदोलन
घाटंजी : येथील तहसील कार्यालयासमोर विदर्भ पटवारी संघाच्यावतीने धरणे देण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे.
शासन दरबारी गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र यावर शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे विदर्भ पटवारी संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तालुक्यातील शिवणी येथील तलाठी पी.के. दुधे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.
याप्रकरणात आम आदमी विमा योजनेच्या लाभासाठी लाभार्थी व ग्रामसेवक यांनी संगनमताने खोटा दाखल तयार करून जिवीत व्यक्तीला कागदोपत्री मृत दाखविले. विमा कंपनीकडून मृत्यू दाव्यातून मिळणारी रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला. या दाव्यावर नोडल एजन्सी तत्कालिन नायब तहसीलदार यांनी तलाठ्यास सही करण्यास भाग पाडले. शासनाच्या निर्देशानुसार ही कामे महाराष्ट्र शासन व विशेष सहाय्य विभागाकडून करून घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आहे.
मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. याबाबतचे निवेदन आॅगस्ट २०१२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तरीही आम आदमी विमा योजनेच्या प्रकरणात तलाठ्यांवर कार्यवाही करण्यात आली. अधिकाऱ्यांना सोडून तलाठ्याचा बळी देण्याचा प्रकार येथे केल्या जात आहे.
याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, तलाठ्यांकडचा अतिरिक्त प्रभार काढण्यात यावा, श्रावण बाळ योजनेच्या जुन्या केसेसे कुठे गहाळ झाल्या याची चौकशी व्हावी, आरडीची रक्कम पगारातून कपात होऊनही नियमित भरल्या जात नाही, तलाठ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मेहनताना देण्यात यावा यासह इतरही मागण्या तलाठी संघाने केल्या आहे. (प्रतिनिधी)