कासोळा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By Admin | Updated: November 7, 2015 02:44 IST2015-11-07T02:44:21+5:302015-11-07T02:44:21+5:30
येथील वीज वितरण कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभाराचा निषेध म्हणून काळी दौ. येथील शेतकऱ्यानी कासोळा येथे गुरूवारी रस्तारोको आंदोलन केले.

कासोळा येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको
महागाव : येथील वीज वितरण कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभाराचा निषेध म्हणून काळी दौ. येथील शेतकऱ्यानी कासोळा येथे गुरूवारी रस्तारोको आंदोलन केले. त्यामुळे पुसद-माहूर मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.
अनेक शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत असून, मोटारी जळत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काळी दौ. परिसर पुसद विधानसभा मतदारसंघात येत असून, स्थानिक आमदार लक्ष देत नसल्याची ओरड शेतकरी करत आहे. जे शेतकरी रोहित्राची मागणी करतात त्यांना ७० हजार रुपये भरण्याची सक्ती केली जाते.
दलालामार्फत गेल्याशिवाय डीपी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केल्या जात होता. याचा परिणाम गुरूवारी रस्तारोको आंदोलनात झाला.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती दौलतराव नाईक, सरपंच गौतम रणवी, जगदीश राठोड, देवानंद पुंड, शेख रेहान, श्रीनिवास मोरे, राजू राठोड, शेख इरफान, मनीष जाधव, रमेश ढगे, बाळू मेटकर यांच्या मार्गदर्शनात कासोळा येथे रास्ता रोको करण्यात आला. यावेळी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (शहर प्रतिनिधी)