दगडाने ठेचून इसमाचा खून

By Admin | Updated: May 25, 2015 02:29 IST2015-05-25T02:29:23+5:302015-05-25T02:29:23+5:30

दगडाने ठेचून एका ५० वर्षीय इसमाचा खून केल्याची घटना दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे शनिवारी रात्री घडली.

The stone crushed his blood | दगडाने ठेचून इसमाचा खून

दगडाने ठेचून इसमाचा खून

पाभळची घटना : पत्नी आणि मुलाने खून केल्याचा संशय
महागाव कसबा : दगडाने ठेचून एका ५० वर्षीय इसमाचा खून केल्याची घटना दारव्हा तालुक्यातील पाभळ येथे शनिवारी रात्री घडली. पत्नी आणि मुलानेच खून केल्याची तक्रार मृताच्या वृद्ध आईने लाडखेड पोलीस ठाण्यात दिली. मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी महागाव कसबा पोलीस चौकीसमोर ठिय्या दिला.
प्रकाश बाबाराव फरकडे (५०) रा. पाभळ ता. दारव्हा असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान तो घरात गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेत त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी नागपूरला नेण्यात आले. मात्र रविवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान मृत प्रकाशची आई ध्रृपदाबाई बाबाराव फरकडे यांनी लाडखेड पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची तक्रार दिली. पत्नी यमुनाबाई प्रकाश फरकडे (४०) आणि मुलगा गजानन प्रकाश फरकडे (१९) यांनीच दगडाने ठेचून प्रकाशचा खून केल्याचे म्हटले. मात्र प्रकाशचे शवविच्छेदन नागपूर येथे झाल्याने आणि त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नसल्याने वृत्तलिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. (वार्ताहर)
प्रेत घेऊन नागरिक पोलीस चौकीत
प्रकाश फरकडे याच्या खून प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करीत पाभळ येथील नागरिक प्रेतासह महागाव कसबा येथील पोलीस चौकीत पोहोचले. या ठिकाणी त्यांनी दोनही आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. प्रकाशचा मृत्यू उपचारादरम्यान नागपूर येथे झाला. तेथेच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसल्याने पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र गावकरी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नागपूरवरून प्रेत वाहनाद्वारे निघाल्याची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी महागाव येथील पोलीस चौकी गाठली. दरम्यान सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास प्रकाशचे प्रेत घेऊन वाहन महागाव येथे पोहोचले. नागरिकांनी प्रेत घेऊन सरळ पोलीस चौकी गाठली. या ठिकाणी लाडखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते. लाडखेड पोलीस ठाण्याचा कर्मचारी नागपूर येथे शवविच्छेदन अहवाल आणण्यासाठी गेला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावरून गुन्हा दाखल करण्यात येईल असे गावकऱ्यांना सांगण्यात आले. मात्र गावकरी आपल्या मागणीवर ठाम होते. वृत्तलिहेस्तोवर प्रेतासह गावकरी पोलीस चौकीवरच ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी येथे अतिरिक्त पोलिसांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Web Title: The stone crushed his blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.