लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केवळ मनाची मौज म्हणून नवीकोरी गाडी चोरायची. दिवसभर फिरवायची. रात्री ती गाडी सार्वजनिक ठिकाणी गुपचूप नेऊन उभी ठेवायची अन् घरी जाऊन झोपायचे... आईवडिलांचा डोळा चुकवून चोरीच्या क्षेत्रात आकंठ बुडालेल्या दोन मुलांनी दिलेली ही कबुली पोलिसांनाही चक्रावून टाकणारी ठरली. रविवारी अवधुतवाडी पोलिसांनी मोठे वडगाव परिसरातून या दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले.शहरात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. अगदी साध्या-साध्या कारणांसाठी गंभीर गुन्हे विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या हातून होत आहे. मोठे वडगाव परिसरातील अल्पवयीन दुचाकी चोरट्यांनी दिलेली कबुली तर अधिकच धक्कादायक आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर २०१९ पासून आपण दुचाकी चोरत असल्याचेही त्यांनी कबूल केले.या अल्पवयीन बालकांची गुन्हा करण्याची पद्धतही तितकीच भन्नाट आहे. त्यांनी चोरीच्या चार दुचाकी काढून दिल्या. ते दोघेच गावात रपेट मारण्यासाठी दुचाकी चोरत होते. खास करून मोपेड दुचाकीला त्यांची पसंती होती. आर्णी मार्गावरील बाळकृष्ण मंगल कार्यालय व पल्लवी लॉन्स येथून प्रत्येकी एक दुचाकी चोरली. विशेष म्हणजे, या दोन्ही दुचाकीला चाबी लागलेली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही दुचाकी चोरताना कोणतीच अडचण आली नाही.अल्पवयीन मुले रोज नवीन दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक विविके देशमुख यांना पेट्रोलिंगदरम्यान मिळाली. यावरून त्या अल्पवयीनांचा शोध सुरू केला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली. यातील एक १५ वर्षांचा तर दुसरा १७ वर्षांचा आहे. दोघेही जिगरी मित्र आहे. त्यांचे कारनामे पोलिसांनाही थक्क करणारे आहेत. अखेर त्यांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी वाहने जप्त केली. त्या दोघांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, एसडीपीओ माधुरी बाविस्कर, ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात शोधपथकातील परसराम अंभोरे, सुरेश मेश्राम, रवी खांदवे, रतीराज मेडवे, सुभाष नागदिवे, सुधीर पुसकर, शेख सलमान शेख, सागर चिरडे यांनी केली.बाबांना कळू नये म्हणून...दोन्ही अल्पवयीन चोरटे एकमेकांचे जिगदी दोस्त आहेत. चोरलेल्या दुचाकी दिवसभर चालवायच्या आणि शहरातील सार्वजनिक ठिकाणी उभ्या ठेवायच्या, हा त्यांचा नित्यक्रम बनला होता. आपली मुले दुचाकी चोरून फिरवत आहेत याची भणकही आईवडिलांना लागू नये, यासाठी त्यांनी ही शक्कल लढविली होती. गाडी घरी नेली असती तर भांडे फुटले असते.पोलिसांना सापडायच्या बेवारस गाड्याचोरलेली गाडी रात्री सार्वजनिक ठिकाणी उभी करण्याची पद्धत या दोन चोरट्यांनी अवलंबली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसात बरेचदा पोलिसांना शहरात बेवारस दुचाकी गाड्या आढळत होत्या. डिसेंबर २०१९ मध्ये वनवासी मारोती परिसरात रोज रात्री एक दुचाकी उभी राहत असल्याची माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून दोन दिवस पाळत ठेवली. मात्र कोणीच फिरकले नाही. शेवटी ही दुचाकी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.
गाडी चोरायची, फिरवायची अन् सोडून द्यायची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST
अल्पवयीन मुले रोज नवीन दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक विविके देशमुख यांना पेट्रोलिंगदरम्यान मिळाली. यावरून त्या अल्पवयीनांचा शोध सुरू केला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली. यातील एक १५ वर्षांचा तर दुसरा १७ वर्षांचा आहे. दोघेही जिगरी मित्र आहे. त्यांचे कारनामे पोलिसांनाही थक्क करणारे आहेत.
गाडी चोरायची, फिरवायची अन् सोडून द्यायची!
ठळक मुद्देदोन अल्पवयीनांच्या कबुलीने पोलीसही चक्रावले : मोठे वडगाव परिसरातून घेतले ताब्यात