बसस्थानकाची केविलवाणी अवस्था

By Admin | Updated: May 4, 2015 00:00 IST2015-05-04T00:00:00+5:302015-05-04T00:00:00+5:30

शहराच्या मध्यवस्तीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दिग्रस बसस्थानकाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे.

The static state of the bus station | बसस्थानकाची केविलवाणी अवस्था

बसस्थानकाची केविलवाणी अवस्था

सुविधांचा अभाव : दिग्रस बसस्थानकाकडे प्रवाशांचीच पाठ, पिण्याच्या पाण्यासाठी ठेवले माठ
सुनील हिरास दिग्रस
शहराच्या मध्यवस्तीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दिग्रस बसस्थानकाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. प्रवाशांनीच या बसस्थानकाकडे पाठ फिरविली असून लांबपल्ल्याच्या बसेसही बसस्थानकात न जाता सरळ निघून जातात. बसस्थानकात बसायला खुर्च्या नाही, रात्री अंधाराचे साम्राज्य आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून केवळ दोन माठ ठेवलेले आहे. दिग्रस बसस्थानकाकडे वरिष्ठांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
दिग्रस या तालुक्याच्या ठिकाणी १९९० पर्यंत बसस्थानक मध्यवस्तीत होते. ही जागा अपुरी पडत असल्याने सुसज्ज बसस्थानक व्हावे म्हणून व्यापक आंदोलन केले. या आंदोलनाला यश आले. दिग्रस-दारव्हा मार्गावर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर सहा एकर विस्तीर्ण जागेत बसस्थानक आणि आगार बांधण्यात आले. सुरुवातीला या ठिकाणी सर्व सुविधा होत्या. परंतु गावापासून लांब अंतरावर असलेल्या बसस्थानकाकडील प्रवाशांनी पाठ फिरविली.
मानोरा चौक, शिवाजी चौक, शंकर टॉकीज, आर्णी नाका आदी भागातूनच प्रवाशांनी बसमध्ये बसणे पसंत केले. परिणामी दिग्रसच्या बसस्थानकावर केवळ बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांचीच गर्दी दिसत होती. आता तर दिग्रस बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासीही बसस्थानकात यायला तयार नसतात. बसस्थानकाच्या आतमध्ये आसन व्यवस्था मर्यादित आहे. प्रवाशांना त्या ठिकाणी उभेच रहावे लागते. बसस्थानकाच्या आवारात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी बांधलेले दुकान गाळे बंद आहे.
रात्री ८ नंतर तर या बसस्थानकात जाण्याची कुणी हिंमतही करू शकत नाही. हायमास्ट लाईट व इतर प्रकाश योजना बंद आहे. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते. मुख्य बसस्थानकाच्या बाजूला झुडूपे वाढले आहे. त्यामुळे प्रवाशात भीतीचे वातावरण असते. प्रसाधनगृहाचीही प्रचंड दुरवस्था झाली असून त्याकडे कोणी लक्ष देत नाही.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
दिग्रस आगार व्यवस्थापक दारव्हा येथून येणे-जाणे करीत आहे. आगार व्यवस्थापकाच्या अप-डाऊनने कर्मचाऱ्यावर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिग्रस आगाराची कोणतीही गाडी वेळेवर सुटत नाही. कर्मचाऱ्यांच्या समस्याही कुणी ऐकून घेत नाही. प्रवाशांनाही सुविधा दिल्या जात नाही.

Web Title: The static state of the bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.