मदन येरावारांना राज्यमंत्रिपद
By Admin | Updated: July 9, 2016 02:33 IST2016-07-09T02:33:59+5:302016-07-09T02:33:59+5:30
यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार मदन मधुकरराव येरावार यांची अखेर मंत्री पदाची स्वप्नपूर्ती शुक्रवारी झाली.

मदन येरावारांना राज्यमंत्रिपद
मुंबईत शपथ : भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, आता नजरा पालकमंत्री पदावर
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आमदार मदन मधुकरराव येरावार यांची अखेर मंत्री पदाची स्वप्नपूर्ती शुक्रवारी झाली. राजभवनात त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तब्बल २० वर्षानंतर यवतमाळ मतदारसंघाला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने भाजपा कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे आहे. त्यामुळे युती सरकारच्या मंत्रीमंडळ स्थापनेपासूनच यवतमाळ जिल्ह्यात भाजपाला मंत्री पद मिळावे अशी मागणी होत आहे. मात्र गेली दोन वर्ष या मागणीला हुलकावणी मिळत होती. यवतमाळात भाजपाला मंत्री पद कसे आवश्यक आहे हे मुख्यमंत्री व पक्ष श्रेष्ठींपुढे पटवून देताना जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचा हवाला दिला जात होता. भाजपा कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, प्रशासनावर शिवसेनेचे वजन आहे, या सारखी ओरडही नेत्यांपुढे केली जात होती. नेत्यांनी प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले. परंतु गेली पावणे दोन वर्ष युती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्तच मिळत नव्हता, अखेर शुक्रवार ८ जुलै रोजी हा मुहूर्त सापडला. मुंबईत राजभवनात दहा मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात मदन येरावार यांनी राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली. वास्तविक येरावार यांना गुरुवारीच मुंबईचे निमंत्रण आले होते. तेव्हाच त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होणार, हे निश्चित झाले होते. त्यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाने जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते आणि विशेषत: येरावार समर्थक हरखून गेले आहेत. या मंत्रीमंडळ शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे २०० कार्यकर्ते गुरुवारीच मुंबईला रवाना झाले होते.
जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार असले तरी यापैकी चार हे पहिल्यांदाच निवडून आले आहे. मदन येरावार यांची ही तिसरी टर्म आहे. त्यामुळे मंत्रीपदावर त्यांचाच पहिला हक्क होता. १० वर्षाच्या आमदारकीत येरावार यांना एकदाही लालदिवा न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळेच त्यांना आता थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, अशी मागणी होती. परंतु त्यांना राज्यमंत्री पद मिळाले. आता येरावार यांच्याकडे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन कॅबिनेट न मिळाल्याची भरपाई युती सरकारने करुन द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. ही मागणी सरकार व पक्षस्तरावर रेटली जात आहे. भाजपाला जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळाल्यास आगामी विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये वर्चस्व निर्माण करणे सोईचे होईल. शिवसेनेला शह देणेही शक्य होईल, असा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
लालदिव्याने वाढविली जिल्ह्यात भाजपाची ताकद
जिल्ह्यात भाजपाची बाजू भक्कम आहे. पाच आमदार आहेत, त्यातील मदन येरावार राज्यमंत्री झाले, पालकमंत्रीही होतील. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे गृह खाते आल्याने कार्यकर्त्यांना आता दुधात साखर पडल्या सारखे झाले आहे. सोबतीला अमरावती विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणारे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आहेतच. त्यामुळे भाजपाची बाजू जिल्ह्यात भक्कम झाली असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री पद येताच भाजपातून पालकमंत्री पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्याच वेळी शिवसेनेने आपल्याकडील यवतमाळचे मंत्रीपद जाऊ नये, यासाठी प्रयत्न चालविल्याचे सांगितले जाते. मदन येरावार व संजय राठोड तसेच हंसराज अहीर यांच्या निमित्ताने जिल्ह्याला तीन लालदिवे मिळाले आहेत.
मीनलताई म्हणतात, कष्टाचे चीज झाले
राज्य मंत्रीमंडळात आमदार मदन येरावार यांचा समावेश म्हणजे त्यांच्या कष्टाचे चीज होय, अशा शब्दात त्यांच्या सुविद्य पत्नी मीनलताई येरावार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, माझ्या पतीने पक्षाचा प्रत्येक शब्द पाळला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी जीव ओतून काम केले. त्यामुळेच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. मला त्यांचा खूप अभिमान आहे. आतापर्यंत जिल्ह्याचे आणि पक्षाचे त्यांनी योग्य नेतृत्व केले. भविष्यातही त्यांच्या हातून या पेक्षाही चांगले काम होईल. जिल्ह्याला न्याय मिळवून देतील. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवितील, असे मीनलतार्इंनी सांगितले.