खरीप हंगामाची लगबग सुरू

By Admin | Updated: May 20, 2015 00:23 IST2015-05-20T00:23:17+5:302015-05-20T00:23:17+5:30

नवीन खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला आहे.

Starting the kharif season | खरीप हंगामाची लगबग सुरू

खरीप हंगामाची लगबग सुरू

३० कोटींची उलाढाल : बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी लवकरच
वणी : नवीन खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला आहे. पाऊसही लवकर येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे. यावर्षी खरीप हंगामात तालुक्यात ३० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस हे नगदी पीक घेतले जाते. गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना निसर्गाने दणका दिला. पहिल्या वर्षी अतिवृष्टी, तर मागीलवर्षी दुष्काळाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. तरीही शेतकरी नव्या उमेदीने नवीन खरीप हंगामाच्या तयारीत गुंतले आहेत. वणी तालुका कापसासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात उच्च दर्जाचा आणि लांब धाग्याचा कापूस निर्माण होतो. त्यासाठी शेतकरी कपाशीचे बियाणे खरेदी करतात. सोबतच मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आणि रासायनिक खतांचीही खरेदी करतात.
वणी तालुक्यात जवळपास २६ हजारांच्यावर शेतकरी आहेत. ते सर्व प्रत्यक्ष अथवा मक्ता, बटईने शेती कसतात. ते बियाणे, खत, कीटकनाशके खरेदी करतात. त्यामुळे तालुक्यात खरीप हंगामात जवळपास ३० कोटी रूपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. बियाणे, खत आणि किटकनाशक खरेदीवर ही सर्व रक्कम खर्च होते. खरिपात बियाणे, खत, रासायनिक खत खरेदीवर शेतकरी बांधव कोट्यवधींचा खर्च करतात. आता पावसाचे संकेत मिळत असल्याने शेतकरी आत्तापासूनच खते, बियाणे खरेदी करण्याचे नियोजन करण्यात गुंग आहेत. शेतकऱ्यांची शहरातील लगबग वाढली आहे. तालुका ठिकाणच्या कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. ऐन पेरणीच्या हंगामात बियाणे मिळणे कठीण जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सध्या बियाणे खरेदी सुरू केली. बियाणे, खते खरेदी करताना शेतकरी काळजी तर घेतातच. तरीही अनेकदा त्यांची फसगत होते. अनेकदा बियाणे उगवत नाही. पाऊस वेळेवर येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागते. त्यासाठी त्यांना जादा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यात निसर्ग वारंवार परीक्षा घेतो. तरीही बळीराजा एका दाण्याचे हजार दाणे करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतो. (कार्यालय प्रतिनिधी)

शेतकरी वळले सोयाबीनकडे
तालुक्यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. आता अनेक शेतकरी बांधव सोयाबीनकडेही वळले आहे. सोबतच खरिपात तूर, ज्वारी, मूग आदी पिकेही घेतली जातात. मात्र कापूस हेच नगदी पीक म्हणून परिचित आहे. आता सोयाबीनही नगदी पीक म्हूणन आता ओळखले जाऊ लागले आहे.

बियाणे कंपन्यांची प्रचार मोहीम जोरात
खरिपाची लगबग सुरू होताच अनेक बियाणे कंपन्यांनी कपाशीसह विविध पिकांचे बियाणे बाजारात विक्रीस आणले. त्यासाठी मोठ्या प्र्रमाणात प्रचार मोहीम राबविली जात आहे. त्यात कोणते बियाणे चांगले व कोणते बोगस, हे ओळखे कठीण झाले आहे. बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून राज्य शासनाने गुणनियंत्रण पथकाची नियुक्ती करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. या पथकात पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांसह काहींचा समावेश राहणार आहे. हे पथक शेतकऱ्यांकडून तक्रार प्राप्त होताच संबंधित वाणांची चौकशी करतील. कृषी साहित्य बोगस असल्याचे आढळून आल्यास संबंधित कृषी केंद्र संचालकांविरुद्ध कारवाई करतील.

६० हजार हेक्टरवर खरिपाची लागवड
वणी तालुक्यात ९२ हजार ३५८ हेक्टर क्षेत्र लागवडयोग्य आहे. त्यापैकी ६० हजार हेक्टरच्यावर क्षेत्रात खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक ३५ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची, तर १५ हजार हेक्टरवर सोयाबिनची पेरणी होण्याची शक्यता आहे. सोबतच तूर, ज्वारी व इतर पिके घेतली जाणार आहे. कापसाच्या लागवडीसाठी तालुक्यातील जमीन अत्यंत उपयुक्त आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच सोसायटीतर्फे पीक कर्जही उपलब्ध झाले आहे.

Web Title: Starting the kharif season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.