आगीच्या आघातातून सावरत प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू

By Admin | Updated: June 18, 2015 02:07 IST2015-06-18T02:07:00+5:302015-06-18T02:07:00+5:30

सहकारी सूत गिरण्यांना मागील तीन वर्षांपासून आधीच मंदीचा सामना करावा लागत आहे. अशातच प्रियदर्शिनी

Start of Priyadarshini Yarn Mill in the fire | आगीच्या आघातातून सावरत प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू

आगीच्या आघातातून सावरत प्रियदर्शिनी सूत गिरणी सुरू

साडेतीन कोटींचे नुकसान : ब्लोरुम डिपार्टमेंटमधील यंत्रणा पूर्ववत
यवतमाळ : सहकारी सूत गिरण्यांना मागील तीन वर्षांपासून आधीच मंदीचा सामना करावा लागत आहे. अशातच प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीला ३१ मे रोजी रात्री १० वाजून २० मिनिटांनी आग लागली. यात ब्लोरुम डिपार्टमेंट पूर्णत: जळाले होते. कर्मचारी व कामगारांनी अथक परिश्रम करून ही आग इतर भागात पसरण्यापासून रोखली. मात्र यातून मार्ग काढत ब्लोरूम डिपार्टमेंटचे कामकाज सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसात संपूर्ण स्थिती पूर्वपदावर येईल, अशी माहिती सूत गिरणीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार कीर्ती गांधी यांनी पत्रपरिषदेत दिली.
या आगीत एक कोटी दहा लाखांच्या ६५० रूईगाठी जळून खाक झाल्या तर दीड कोटींचे मशिनरीचे नुकसान झाले. उत्पादन थांबल्यामुळे प्रतिदिवस २० लाखांचे नुकसान सोसावे लागले. तब्बल १६ दिवसानंतर सूत गिरणीने ब्लोरूम डिपार्टमेंट सुरू केले आहे. सूत गिरणीने युनायटेड इंडिया इन्शूरन्स या शासकीय भागीदारी असलेल्या कंपनीची विमा पॉलिसी घेतली आहे. यामधून सर्व जळालेल्या मशीन, बेल्सची (रूईगाठी) रिप्लेसमेंट मिळणार आहे. मात्र कागदपत्राची पूर्तता करून त्याचा लाभ मिळेपर्यंत एक वर्षाचा कालावधी लोटणार आहे. या आगीत उत्पादन थांबल्याने झालेले नुकसान आणि कामगारांचे वेतन भरुन निघणे कठीण आहे.
शिवाय सलग तीन वर्षांपासून मंदीची झळ सोसत असलेल्या सूत गिरणी प्रशासनाला हे संकट खरोखरच अडचणीत आणणारे आहे, असे गांधी यांनी सांगितले.
प्रियदर्शिनी सूत गिरणीत लागलेली आग हा मंदीच्या काळातील सर्वात मोठा आघात होता. आजही तो दिवस आठवल्यावर सर्वांच्याच अंगावर शहारे येतात. आगीची घटना घडली तेव्हा गिरणीतील जिगरबाज कामगार आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगी जीव धोक्यात टाकून आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी प्रशासनाकडूनही भरपूर सहकार्य मिळाले. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी स्वत: घटनास्थळावर उपस्थित होते. रेमंड समूहाचीही मदत झाली. याशिवाय यवतमाळ, अमरावती, नेर येथील अग्नीशमन बंब पाचारण करण्यात आले होते. रात्री १०. ३० वाजता लागलेली आग दुसऱ्या दिवशी सायंकाळी पूर्णत: विझविण्यात यश आले. मात्र दरम्यानच्या काळात ही आग इतरत्र पसरु नये म्हणून कर्मचाऱ्यांनी व कामगारांनी मोठे परिश्रम घेतले. सहा हजार सभासद असलेली ही सूत गिरणी सर्वांच्या शुभेच्छांच्या पाठबळावर आता पुन्हा सुरू झाली आहे.
ज्या भागात आग लागली होती, त्या ब्लोरूम डिपार्टमेंटमधील एक लाईन चार दिवसापूर्वीच सुरू केली. तर दुसरी लाईन बुधवारी सकाळी सुरू करण्यात आली आहे. आता कामगारही पूर्ववत कामावर येत आहे. दोन दिवसात पूर्ण क्षमतेने उत्पादन केले जाईल, असेही गांधी यांनी सांगितले. यावेळी संचालक माणिकराव भोयर, महाव्यवस्थापक डॉ. जे.सी. रघुरामन हे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Start of Priyadarshini Yarn Mill in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.