कापूस खरेदी सुरू करा
By Admin | Updated: October 21, 2015 02:41 IST2015-10-21T02:41:07+5:302015-10-21T02:41:07+5:30
दिवाळी जवळ येऊनही अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पेचात पडले आहेत.

कापूस खरेदी सुरू करा
शेतकऱ्यांची मागणी : बाभूळगाव संकलन केंद्रावर लक्ष
बाभूळगाव : दिवाळी जवळ येऊनही अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पेचात पडले आहेत. बाभूळगाव कापूस संकलन केंद्रावर तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत जवळपास सव्वाशे गावे जोडलेली आहे. बाभूळगाव संकलन केंद्रावर एक ते सव्वा लाख क्विंटल कापसाची आवक होण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांची कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. कापूस वेचणीला प्रारंभ झाला आहे. दिवाळी जवळ आलेली असून कापूस खरेदी अद्यापपर्यंत सरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस कुठे न्यावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यंदा कापसाचे उत्पादन पाहता लवकरात लवकर कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बाभूळगाव संकलन केंद्रापासून सर्व कापूस संकलन केंद्रही जवळपास २५-३० किलोमीटरवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. कार्यक्षेत्रामध्ये दोन खासगी जिनिंग चालू अवस्थेत असून दोन सहकारी व फेडरेशन जिनिंग बंद अवस्थेत आहेत. सॉ जिनिंग हा कापूस पणन महासंघाच्या मालकीचा असून हा जीन बंद पडल्यामुळे बाभूळगाव बाजारपेठेमध्ये अवकळा पसरली आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी सदर जीन चालू करण्याबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे झाल्यास बाभूळगावच्या बाजारपेठेला जुने वैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे. बाभूळगाव बाजार समिती ही एकमेव संस्था कार्यरत असून धान्याच्या उत्पन्नावर या बाजार समितीचे अस्तित्व कायम आहे. येथे सध्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला ३५०० ते ३८०० असा भाव आहे. खासगी व्यापारी व सीसीआय यांचे धोरण निश्चित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ९ नोव्हेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे लागलेले आहे. त्यातच कापूस पणन महासंघाचा व सहकारी रामचंद्र जिनिंग बंद असल्यामुळे तसेच खासगी कापूस खरेदीची, सीसीआयची अनिश्चितता असल्यामुळे कापूस विक्रीसाठी कोठे न्यावा, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)