शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठिय्या आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: November 24, 2014 23:07 IST2014-11-24T23:07:29+5:302014-11-24T23:07:29+5:30
भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असून,

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठिय्या आंदोलनाचा इशारा
यवतमाळ : भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव देण्याचे जाहीर केले होते. आता दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असून, त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला जाहीर केलेला दर द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात दाभडी येथे शेतीच्या मुद्यावरच विशेष कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात उत्पादन खर्चावर अधिक ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव शेतमालाला दिला जाईल असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र या आश्वासनाची पूर्तता शासनाकडून अद्यापही करण्यात आली नाही. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार म्हणून काम करताना सातत्याने शेतमालाच्या हमीभावासाठी आग्रही भुमिका घेतली आहे. आता मात्र मुख्यमंत्रीही शेतमालाला त्यांनी मागणी केलेला भाव देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. २०१४-१५ या वर्षासाठी कृषिमूल्य आयोगाने पिकांचे जाहीर केलेल दर शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आहेत. कापसाला सहा हजार प्रती क्विंटल आणि सोयाबीनला पाच हजार, धानाला तीन हजार रुपये प्रती क्विंटल दर द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन ३० नोव्हेंबरपासून करण्यात येत आहे, असे चटप यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघटक देवेंद्र राऊत, जयंतराव बापट, नितीन देशमुख, रमेश मांगुळकर, इंदरचंद बैद, बालाजी काकडे, द.रा. राजूरकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)