एसटी कामगारांचा अग्रीमसाठी ठिय्या
By Admin | Updated: November 5, 2015 03:05 IST2015-11-05T03:05:27+5:302015-11-05T03:05:27+5:30
सण अग्रीम देण्यासाठी रक्कम उपलब्ध होऊनही वितरणास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप करून एसटी

एसटी कामगारांचा अग्रीमसाठी ठिय्या
यवतमाळ : सण अग्रीम देण्यासाठी रक्कम उपलब्ध होऊनही वितरणास जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप करून एसटी कामगारांनी बुधवारी येथील विभाग नियंत्रक कार्यालयात ठिय्या दिला. अग्रीम देण्यास विलंब होत असल्याचे पाहून कामगार दुपारी ४ वाजताच या कार्यालयावर धडकले. सायंकाळी ६ वाजतापर्यंत यावर कुठलाही निर्णय न घेता वरिष्ठ अधिकारी निघून गेले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या अडेलतट्टूपणाविषयी रोष व्यक्त होत आहे.
यवतमाळ विभागातील एसटी कामगारांना अग्रीम देण्यासाठीची रक्कम उपलब्ध झाल्याची माहिती कामगारांना मिळाली. ही रक्कम बुधवारी मिळेल, या आशेवर कामगार होते. मात्र यासंदर्भात कुठलाही निर्णय महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने घेतला नाही. दरम्यान, कामगारांनी विविध ठिकाणच्या विभागीय कार्यालयातील सहकाऱ्यांना संपर्क केला. काही ठिकाणी अग्रीम रकमेचे वितरण झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे ते अधिक आक्रमक झाले. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू गाडगे यांच्या नेतृत्त्वात अनेक कामगारांनी अग्रीम मिळण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र त्यांची ही मागणी गांभीर्याने घेण्यात आली नाही.
वेतन झाल्यानंतर अग्रीम रकमेचे वाटप केले जाईल, असे काही अधिकाऱ्यांनी कामगारांना सांगितले. त्यामुळे हा प्रश्न अधिकच चिघळला. गुरुवारी या विषयावर पुन्हा अधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात विभाग नियंत्रक शिवाजी जगताप यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, अग्रीम रकमेचे वितरण करण्यासाठी रक्कम उपलब्ध झाली आहे. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तत्काळ वितरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)