नव्या कायद्याविरोधात एसटी कामगारांची निदर्शने
By Admin | Updated: December 18, 2014 23:03 IST2014-12-18T23:03:06+5:302014-12-18T23:03:06+5:30
केंद्र शासनाच्या प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट आणि सेप्टी बिल २०१४ या नव्या कायद्यामुळे एसटीवर प्रतिकूल परिणाम होऊन एसटी उद्योगासह प्रवाशांनाही सेवा मिळणे अडचणीचे जाणार आहे.

नव्या कायद्याविरोधात एसटी कामगारांची निदर्शने
यवतमाळ : केंद्र शासनाच्या प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट आणि सेप्टी बिल २०१४ या नव्या कायद्यामुळे एसटीवर प्रतिकूल परिणाम होऊन एसटी उद्योगासह प्रवाशांनाही सेवा मिळणे अडचणीचे जाणार आहे. या कायद्याच्याविरोधात यवतमाळ विभागात सर्वच आगार युनिटमध्ये निदर्शने आंदोलन करण्यात आले.
१९५९ च्या कायद्यामुळे एसटी महामंडळाचे राष्ट्रीयकरण होऊन टप्पे वाहतुकीची परवानगी फक्त एसटीलाच आहे. या कायद्यामुळे मात्र एसटीसह खासगी वाहतूकदारांना टप्पा वाहतूक करण्याची परवानगी मिळणार आहे. निविदा पद्धतीने मार्गांवर वाहतूक करण्याची तरतूद या कायद्यात असून राज्य परिवहन प्राधिकरणाच्या आदेशानुसार परवाने वितरित होऊन भविष्यात बसस्थानकावरून खासगी वाहतूकदार प्रवासी वाहतूक करणार. निविदा पद्धतीने मार्ग विकल्या गेल्यानंतर त्या मार्गावर मार्ग विकत घेणारे खासगी वाहतूकदारच प्रवासी वाहतूक करतील. त्यामुळे प्रवाशांची मात्र यात पिळवणूक होणार असल्याचा आरोप एसटी संघटनेने केला आहे.
आज एसटी महामंडळाकडून प्रवाशांना विविध प्रकारच्या २३ सवलती दिल्या जातात. भविष्यात या सवलतीही बंद होण्याची शक्यता संघटनेने वर्तविली आहे. महामंडळातर्फे प्रतिदिन २९ हजार ६३७ बंधनकारक फेऱ्यांद्वारे ३१.३६ कोटी किलोमीटर चालविल्या जाते. त्यामुळे महामंडळाला अशा प्रकारच्या डोंगराळ व अतिदुर्गम भागात चालविण्यात येणाऱ्या फेऱ्यांमुळे प्रतिवर्षी ५७३.६१ कोटी रुपये इतका तोटा सहन करावा लागतो. प्रस्तावित कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अशा तोट्याच्या मार्गावर खासगी वाहतूकदार सेवा देणार नाही. त्यामुळे अशा मार्गांवरील प्रवाशांना सेवा मिळणे अडचणीचे जाणार आहे.
खासगी वाहतुकीला टप्पे वाहतुकीचे परवाने देऊ नये, खासगी वाहनांना बसस्थानकांचा वापर करण्यास परवानगी देऊ नये, निविदा पद्धतीने प्रवासी वाहतुकीची परवानगी देऊ नये, रस्ते वाहतूक व सुरक्षा बिल २०१४ मध्ये एसटीला मारक असलेली कलमे रद्द करावी, प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा विस्तार करून सक्षम करण्यासाठी सहाय्य करावे, अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करावे, नवीन गाड्यांचा पुरवठा करावा, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यवतमाळ येथील विभागीय कार्यशाळेत या आंदोलनात विभागीय सचिव सदाशिव शिवणकर, प्रवीण बोनगिरवार, राहुल धार्मिक, कापसे, गावंडे, नीलेश जगताप, कोटजावळे, पी.के. ढोले, राजेंद्र भोसले, यादव, मराठे, हापसे, जया शिंदे, देठे, खोडे आदी कामगारांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)