एसटी महामंडळाने टाकला बदलीचा ‘गीअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 05:00 IST2021-12-05T05:00:00+5:302021-12-05T05:00:02+5:30

विशेष म्हणजे, हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून प्रवासाला किमान दोन ते तीन तास लागतील एवढ्या अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ५७ जणांना आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा शनिवारी ३५ वा दिवस उजाडला आहे.

ST Corporation throws replacement 'gear' | एसटी महामंडळाने टाकला बदलीचा ‘गीअर’

एसटी महामंडळाने टाकला बदलीचा ‘गीअर’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असतानाच एसटी महामंडळाने ते कामावर यावेत यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. शनिवारी अचानक संपावरील कर्मचाऱ्यांच्या बदलींचे आदेश काढण्यात आले आहेत. यवतमाळ विभागातील ५१ जणांना हा आदेश देऊन लगेच कामावर हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 
विशेष म्हणजे, हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून प्रवासाला किमान दोन ते तीन तास लागतील एवढ्या अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ५७ जणांना आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा शनिवारी ३५ वा दिवस उजाडला आहे. या काळात महामंडळाने केलेल्या विविध प्रयत्नानंतरही बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. आतापर्यंत यवतमाळ विभागातील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर ३५ हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले गेले.
संपावरील कर्मचाऱ्यांवर या कारवाईचा कुठलाही फरक होत नसल्याचे पाहून महामंडळाने शनिवारी अचानक कर्मचाऱ्यांचे बदली आदेश काढले. यवतमाळ विभागातील ४६ चालक, वाहकांची, तर चार सहायक आणि एका बॉडी फिटरची बदली केली आहे. गुरुवारी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विभाग नियंत्रकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यामध्ये करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. 
दिग्रस, वणी, दारव्हा, उमरखेड, राळेगाव, नेर, पुसद, यवतमाळ आगारातील प्रत्येकी पाच, पांढरकवडा आगारातील सहा, तर विभागीय कार्यशाळेतील पाच कर्मचाऱ्यांची बदली विभाग नियंत्रकांच्या आदेशाने करण्यात आली आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हा कालावधी नाही. साधारणत: विनंती बदल्या या काळात केल्या जातात. मार्च किंवा जूनमध्ये सार्वत्रिक बदल्या होतात. शुक्रवारी काढण्यात आलेले बदली आदेश कर्मचारी कामावर यावेत यादृष्टीनेच काढले असल्याचे सांगितले जात आहे.

शनिवारी दिग्रसमधून अवघी एक बसफेरी 
- शनिवारी दिग्रस आगारातील दोन कर्मचारी कामावर हजर झाले. त्यांच्या माध्यमातून एक बस मार्गावर सोडण्यात आली. दिग्रस-दारव्हा-यवतमाळ असा या बसचा मार्ग होता. या बसफेरीला बऱ्यापैकी प्रवासी मिळाल्याचे सांगितले जाते.

 

Web Title: ST Corporation throws replacement 'gear'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.