आश्रमशाळा तपासणीसाठी भरारी पथक

By Admin | Updated: July 16, 2014 00:27 IST2014-07-16T00:27:12+5:302014-07-16T00:27:12+5:30

विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत बंद असलेल्या आदिवासी आश्रमशाळांवर आता प्रकल्प कार्यालयाचे भरारी पथक धडकणार आहेत. या पथकांना तपासणी करून वास्तव अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांनी

The squad for checking the Ashramshala | आश्रमशाळा तपासणीसाठी भरारी पथक

आश्रमशाळा तपासणीसाठी भरारी पथक

पीओंकडून दखल : अहवाल मागितला
प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा
विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत बंद असलेल्या आदिवासी आश्रमशाळांवर आता प्रकल्प कार्यालयाचे भरारी पथक धडकणार आहेत. या पथकांना तपासणी करून वास्तव अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
२६ जूनला शासनाच्या सर्व शाळा उघडल्या. परंतु आदिवासी आश्रमशाळा तीन आठवडे लोटूनही उघडल्या नाही. म्हणून ‘लोकमत’ने सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण असलेल्या तीन प्रातिनिधीक शाळांचे स्टिंग आॅपरेशन केले. त्यात या तीनच नव्हे तर बहुतांश आश्रमशाळा बंदच असल्याचे आढळून आले. ‘लोकमत’च्या या स्टिंग आॅपरेशनची पांढरकवडा येथील आदिवासी विकास विभागाचे नवनियुक्त प्रकल्प संचालक डॉ. प्रशांत रुमाले यांनी दखल घेतली आहे. स्टिंग आॅपरेशन केलेल्या तीनच नव्हे तर आपल्या अखत्यारीतील २८ अनुदानित व २२ शासकीय आश्रमशाळांची तपासणी करण्याचा निर्णय डॉ. रुमाले यांनी घेतला. त्यासाठी अतिरिक्त प्रकल्प अधिकारी शिवानंद खेडेकर यांच्या नेतृत्वात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात सहायक प्रकल्प अधिकारी, लेखाधिकारी, दोन शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व कार्यालय अधीक्षक अशा सात सदस्यांचा समावेश आहे. या पथकाला पाच दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
आखाडीमुळे विद्यार्थी नाही, असे आश्रमशाळांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नोंदणीच्या अर्धेच विद्यार्थी वास्तवात असल्याचे सांगण्यात येते. मात्र पूर्ण विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवून शासनाकडून पैसा उकळला जातो. जुलै महिन्यातसुद्धा विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती दाखवून शासनाकडून अनुदानाची रक्कम उचलण्याचा संस्थानिकांचा मनसुबा होता. परंतु स्टिंग आॅपरेशनने आता तो उधळला गेला आहे.
प्रशासकच भरारी पथकात !
वांजरी, वाघोली आणि अकोलाबाजार या तीन आश्रमशाळा सुमारे दोन वर्षांपासून एपीओ तथा प्रशासक शिवानंद खेडेकर यांच्या नियंत्रणात आहे. आता भरारी पथकाचे नेतृत्व या खेडेकर यांच्याकडे देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे भरारी पथक खरोखरच प्रामाणिकपणे अहवाल देईल का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. खेडेकर यांच्या नियंत्रणातील तीनही शाळांना स्वत: पीओ डॉ. रुमाले यांनी भेटी देऊन ‘वास्तव’ पुढे आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: The squad for checking the Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.