वसंत जिनिंगच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: February 13, 2016 02:18 IST2016-02-13T02:18:38+5:302016-02-13T02:18:38+5:30
येथील वसंत को-आॅपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अॅन्ड पे्रसिंग फॅक्टरी संस्थेसंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मार्च २०१५ मध्ये अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली होती.

वसंत जिनिंगच्या चौकशीचे आदेश
वणी : येथील वसंत को-आॅपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अॅन्ड पे्रसिंग फॅक्टरी संस्थेसंदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मार्च २०१५ मध्ये अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यावरून या संस्थेची चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी दिले.
‘वसंत’च्या चौकशीकरिता महाराष्ट्र शासन, सहकार व वस्त्रोद्योग विभाग यांच्या आदेशाने जिल्हा उपनिबंधकांना चौकशी करण्याचे आदेश होते. त्यावरून आता दारव्हा येथील सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. २४ महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहे.
‘वसंत’ची सात एकर जमीन १५ महिन्यांच्या करारनाम्यावर २१ कोटी रूपयांत विक्री करण्यात आली होती. मात्र अद्याप विक्री करण्यात आली नाही. १५ महिन्यात व्यवहार पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र करारनामा पूर्ण न करता खरेदीदराकडून टप्याटप्याने बिनव्याजी पैसे घेणे व करारनामा रद्द न करणे, २१ कोटी रूपयांत मालमत्ता जीन विक्री केली असताना सहा नवीन बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात कर्ज उचलणे, नवीन मशीनसाठी जादा दराने निविदा मंजूर करणे, संस्थेची निवडणूक मुदत होऊनही न घेणे व याद्या प्रसिद्ध न करणे, याबाबत चौकशी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश चौकशी अधिकाऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)
अध्यक्ष म्हणतात, यापूर्वीच मिळाली ‘क्लिन चिट’ !
यापूर्वी झालेल्या चौकशीत ‘क्लिन चिट’ मिळाली, असे ‘वसंत’ जिनींगचे अध्यक्ष अॅड. देवीदास काळे म्हणाले. पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली असताना कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत का चौकशी करण्यात येत आहे? आमदारांनी त्याचवेळी दबाव टाकून फेरचौकशी करवून घेतली होती, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे आता ही चौकशी न्यायसंगत म्हणता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.