क्रीडा संकुल केवळ नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:56 IST2017-08-28T22:56:26+5:302017-08-28T22:56:45+5:30
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचे शासनाचे धोरण असताना दारव्हा येथे संकुल उभारण्यात आले नाही.

क्रीडा संकुल केवळ नावालाच
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचे शासनाचे धोरण असताना दारव्हा येथे संकुल उभारण्यात आले नाही. उलट आहे त्याही मैदानाची निगा राखली जात नाही. त्यामुळे अशा स्थितीत खेळाडूंना सराव करावा लागतो. शासनाकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याने क्रीडा क्षेत्राला चालना मिळणार कशी, ग्रामीण भागातून प्रतिभावान खेळाडू तयार होणार कसे, असा सवाल दारव्हा तालुक्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींनी क्रीडा दिनाच्या निमित्ताने उपस्थित केला आहे.
अखिल भारतीय फुटबॉल सामन्याच्या आयोजनामुळे दारव्हा शहराचे नाव देशपातळीवर पोहोचले आहे. येथील खेळाडूंनीसुद्धा अनेक मैदाने गाजविली आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये पात्रता निश्चितच आहे. परंतु त्यांना त्या प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्धच करून दिल्या जात नाही. शहरातील शिवाजी स्टेडियमवर कसाबसा सराव केला जातो. परंतु या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाही. चैतन्य ग्रुपचे सदस्य मैदान साफ करून रोज खेळतात. त्यांच्यामुळेच खºयाअर्थाने ज्या खेळाने दारव्हा शहराला देशपातळीवर ओळख दिली तो फुटबॉल हा खेळ जिवंत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शासन, प्रशासन मात्र खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी काहीच करीत नाहीत.
क्रीडा संकुलात पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध नाही. प्रसाधनगृहांची दुरावस्था झाली आहे. रात्रीला मैदानावरच ओल्या पार्ट्या रंगतात. त्याच ठिकाणी शिश्या फोड्या जातात. बचत भवनातील बॅडमिंटन कोर्टचीसुद्धा खस्ता हालत आहे. पाट्या उखडल्या आहेत. आतमध्ये प्रकाशाची व्यवस्था नाही. तरीदेखील अनेक खेळाडू नियमित या ठिकाणी सराव करतात. हे दोन खेळ सोडल्यास तालुक्यात मैदानी आणि इनडोअर खेळांसाठी जागाच नाही. त्यामुळे शहरात क्रीडा संकुल उभारणे गरजेचे आहे.
लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा
या विभागाचे आमदार व राज्यमंत्री संजय राठोड यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. तसेच शिवाजी स्टेडियमची नियमित निगा राखली जावी, बॅडमिंटन कोर्टची दुरुस्ती व्हावी, जिममधील साहित्यांची दुरुस्ती करावी तसेच इतर साहित्य पुरविण्यात यावे, तालुका क्रीडा अधिकारी व इतर पदे त्वरित भरण्यात यावी, सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल उभारण्यात यावे व त्या ठिकाणी सर्व खेळ खेळण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, तालुका क्रीडा समितीची नियमित बैठक व्हावी आदी मागण्या क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी केल्या आहे. याकडे गांर्भियाने पाहण्याची गरज आहे.