उद्घाटनापूर्वीच जलकुंभाला भगदाड
By Admin | Updated: December 31, 2016 01:06 IST2016-12-31T01:06:59+5:302016-12-31T01:06:59+5:30
लोहारा परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी वाघापूर-लोहारा बायपासवरील वैभवनगरात बांधण्यात आलेल्या

उद्घाटनापूर्वीच जलकुंभाला भगदाड
जीवन प्राधिकरण : ‘ट्रायल’लाच धो-धो, चहूबाजूने लागल्या धारा
यवतमाळ : लोहारा परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी वाघापूर-लोहारा बायपासवरील वैभवनगरात बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे पितळ चाचणीतच उघडे पडले. पाणी भरताच जलकुंभाला चौफेर धारा लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. संपूर्ण परिसर जलयम झाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मात्र याविषयी सारवासारव केली जात आहे.
पाच वर्षापूर्वी मंजूर झालेल्या लोहारा वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत दारव्हा रोडवरील सुयोग नगरात एक आणि वैभवनगरात दुसरा जलकुंभ उभारण्यात आला. वैभवनगरातील जलकुंभ चाचणी घेण्यासाठी गुरूवारी भरण्यात आला. लाखो लिटर पाणी त्यामध्ये भरण्यात आले. वास्तविक या जलकुंभाचे बरेच काम शिल्लक आहे. तरीही चाचणीची घाई करण्यात आली. पाणी भरताच जलकुंभाच्या सर्व भागाकडून पाणी धो-धो वाहण्यास सुरूवात झाली. चार ते पाच इंचाच्या पाईपमधून वाहतात ऐवढ्या या पाण्याच्या धारा होत्या. परिसरातील नागरिकांनी हा विषय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. परंतु ही बाब त्यांच्या हाताबाहेर गेली होती. पाण्याचा अपव्यय होताना पाहण्याशिवाय त्यांच्याकडे उपाय नव्हता.
वास्तविक नवीन बांधलेल्या जलकुंभाची चाचणी घेण्यासाठी त्यात टप्प्याटप्प्याने पाणी भरणे अपेक्षित आहे. शिवाय, आतील छपाई झाली की नाही, आऊटलेट, इनलेट, बायपास, ओव्हरफ्लो सुस्थितीत बसविला आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र वैभवनगरातील जलकुंभाची चाचणी या सर्व बाबी न तपासता करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्राधिकरणाने चाचणीसाठी इतकी घाई का केली, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. (शहर वार्ताहर)
फिनिशिंगपूर्वीच भरले जलकुंभ
वैभवनगरातील जलकुंभातून धो-धो पाणी वाहत असल्याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता बेले यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी छपाई आणि फिनिशिंग न झाल्याने जलकुंभातून पाणी वाहत असल्याचे सांगितले. खुद्द या विभागाच्या अधिकाऱ्यानेच काम पूर्ण न झाल्याच्या बाबीला दुजोरा दिला. मात्र आता या प्रकाराविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी मजीप्रा ‘सजग’ आहे. मग वैभवनगरातील जलकुंभ भरताना विचार का केला गेला नाही असा प्रश्न उपस्थित केला.