राजकारणात मतदारांची बोळवण
By Admin | Updated: October 30, 2016 00:23 IST2016-10-30T00:23:10+5:302016-10-30T00:23:10+5:30
स्थानिक पातळीवर विशेषत: नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाचे डावपेच फारसे प्रभावी ठरत नसतात

राजकारणात मतदारांची बोळवण
उमरखेड : स्थानिक पातळीवर विशेषत: नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाचे डावपेच फारसे प्रभावी ठरत नसतात असा अलिकडे नेत्यांचा गोड समज होऊन बसलाय. हे सूत्र धरुन पक्षीय विचारसरणीला फाटा देण्याची प्रथा स्थानिक निवडणुकांमध्ये बोकाळून आघाड्यांचे राजकारण स्थानिक पातळीवर सरसकट दिसत आहे. उमरखेड नगरपालिकेतही तेच घडले.
खरे तर कोणत्याच पक्षात एकवाक्यता अलिकडे राहिलेली नाही. लोकांना जे अपेक्षित असते ते कधीच घडत नसते. भाजपा-सेनेमध्ये स्थानिक स्तरावर तरी युती होईल, हे दोनही पक्ष एकत्रित लढतील असे उमरखेडच्या जनतेला वाटले होते. पण तसे घडलेच नाही. माहेश्वरी काँग्रेसचेच; परंतु कॉँग्रेसची कार्यशैली आणि काँग्रेसमधीलच काही अट्टाहासी लोकांवर ठपका ठेऊन माहेश्वरी गटाने भाजपाशी साठगाठ केली. सेनेचे भाजपाशी जुळण्याचे संकेत मुळीच दिसत नाहीत हे पाहून माहेश्वरी गटाने तातडीने भाजपाशी साठगाठ केली. इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार यांच्याशी जवळीक करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरूच ठेवला. परंतु कोणत्याच गटाला जागीरदारांचा प्रत्यक्ष सहभाग मिळवता आला नाही. कारण जागीरदारांच्याच प्रयत्नाने नगराध्यक्षाच्या थेट निवडणुकीमध्ये एका प्रामाणिक विचारमंचाच्या माध्यमातून २००१ मध्ये प्रस्थापितांच्या सत्तेला उमरखेडमध्ये हादरा दिला होता हे विशेष. प्रत्येक गट जागीरदारांशी जवळीक साधण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. जनतेच्या मनात जागीरदारांची कारकीर्द अजूनही ताजी आहे. उमरखेडच्या जनतेला आता प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे.
सर्वसामान्य माणसाला त्यांच्या अधिकारातल्या सुख-सुविधा मिळतील काय? कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबेल काय ? सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य अबाधित राहील काय? इत्यादी प्रश्नांनी नागरिकांना घेरले आहे. सोईचे राजकारण करून निवडणुकीच्या तोंडावर आघाड्यांच्या कुबड्या घेऊन परत सत्तेत मिरवणाऱ्यांचीही आता नागरिकांना चीड येत आहे. (प्रतिनिधी)