स्टुडंटस् इस्लामिकतर्फे विशेष शैक्षणिक मोहीम
By Admin | Updated: September 9, 2016 02:43 IST2016-09-09T02:43:06+5:302016-09-09T02:43:06+5:30
सध्या गरिबांची मुले सरकारी शाळेत जातात. तर श्रीमंतांच्या मुलांसाठी उच्चभ्रू शाळांचे प्रस्थ वाढले आहे.

स्टुडंटस् इस्लामिकतर्फे विशेष शैक्षणिक मोहीम
रेहान फजल : गरिब-श्रीमंतांसाठी सारखीच शाळा हवी
यवतमाळ : सध्या गरिबांची मुले सरकारी शाळेत जातात. तर श्रीमंतांच्या मुलांसाठी उच्चभ्रू शाळांचे प्रस्थ वाढले आहे. मात्र सामाजिक विकासाच्या दृष्टीने ही बाब घातक आहे. त्यामुळे गरिब आणि श्रीमंत अशा सर्वांच्या मुलांसाठी सारखीच शाळा असली पाहिजे, अशी मागणी स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेहान फजल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा घडविण्यासाठी स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनतर्फे शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यासंदर्भात येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. आॅर्गनायझेशनचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेहान फजल म्हणाले, १ ते १० सप्टेंबर अशी दहा दिवसीय मोहीम आम्ही राबवित आहोत. शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा घडविणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे. सुधारणा का हवी, याबाबत सांगताना ते म्हणाले, आपली शिक्षण व्यवस्था मूळ उद्दिष्टांपासून दूर गेली आहे. आज शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रामुख्याने तंत्रज्ञानाकडे वळत आहेत. शिक्षण घेऊन एखाद्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळविणे हेच त्यांचे ध्येय दिसते. मात्र, सामाजिक विकासाबाबत विचार करण्याचा दृष्टिकोन रुजविण्यात आजची शिक्षण व्यवस्था कमी पडत आहे. केवळ टेक्नॉलॉजीकडे वळून मुलं कंपन्यांचे गुलाम बनत आहे. सुज्ञ नागरिक घडत नाही. त्यामुळे समाजाभिमुख शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
अभ्यासक्रमाबाबत बोलताना रेहान फजल म्हणाले, पूर्वीचा अभ्यासक्रम हा परीक्षा केंद्रित होता. नंतर तो शिक्षक केंद्रित झाला आणि आता तर चक्क नोकरी केंद्रित झाला. हे धोकादायक आहे. खरे म्हणजे, शिक्षण हे समाज केंद्रित असावे. सरकार लष्कराच्या प्रशिक्षणावर मोठा खर्च करते. तसाच खर्च शिक्षकांच्या प्रशिक्षणावर का करत नाही. किंबहुना शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सक्षम यंत्रणाच सरकारकडे नाही. राष्ट्रीय उत्पन्नाचा केवळ ६ टक्के हिस्सा शिक्षणावर खर्च केला जातो. तो खर्च वाढविण्याची तीव्र गरज आहे, अन्यथा शिक्षणाचा दर्जा सुधारणा नाही, अशी भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.
शासकीय धोरणाबाबत बोलताना फजल म्हणाले, सध्या अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षण लादण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही महापुरुषांना जाणीवपूर्वक एका समाजाचे विरोधक म्हणून चित्रित केले जात आहे. त्यातून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. या पत्रकार परिषदेला रेहान फजल यांच्यासह सईद शहाबुद्दीन, स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनचे यवतमाळ अध्यक्ष झियाउर रेहमान उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)