सभापतींनी पांघरले घोंगडे

By Admin | Updated: March 9, 2017 00:08 IST2017-03-09T00:08:58+5:302017-03-09T00:08:58+5:30

बाजार समित्यांमध्ये तूर साठवणुकसाठी बारदाना उपलब्ध नसल्याने बुधवारी जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी पोत्यांचे घोंगडे घालून

Speakers wearing glasses | सभापतींनी पांघरले घोंगडे

सभापतींनी पांघरले घोंगडे

बारदान्यासाठी आंदोलन : व्यापाऱ्यांचे हित जोपासले जात असल्याचा आरोप
यवतमाळ : बाजार समित्यांमध्ये तूर साठवणुकसाठी बारदाना उपलब्ध नसल्याने बुधवारी जिल्ह्यातील बाजार समिती सभापतींनी पोत्यांचे घोंगडे घालून अभिनव आंदोलन केले. त्यांनी प्रशासनाला दोन दिवसांत बारदाना उपलब्ध करून देण्याचा अल्टीमेटम निवेदनाव्दारे दिला.
शेवटच्या दान्यापर्यंत तुरीची खरेदी करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असली, तरी जिल्ह्यात काही केंद्रांवर गेल्या सहा दिवसांपासून बारदान्याअभावी तूर खरेदी ठप्प पडली आहे. यामुळे संतप्त सभापतींनी येथील तिरंगा चौकात आंदोलन केले. त्यांनी राज्य शासनाचा निषेध केला. येत्या दोन दिवसात प्रश्न न सुटल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला. पोत्यांची घोंगडी पांघरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शासकीय तूर खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली आहे. ३० हजार क्विंटलपेक्षा जादा तूर १५ केंद्रांवर खरेदीच्या प्रतीक्षेत पडून आहे. मात्र सहा दिवसांपासून बारदाना पोहोचला नाही. खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. राज्य शासनाला त्याची चिंता नाही.
बारदाना निघाला, अशी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा, तसेच राज्य शासनाने व्यापाऱ्यांचे हित जोपासण्यासाठीच बारदान्याचे नाटक केल्याचा आरोप सभापतींनी केला. सरकार केवळ बोलघेवडे असून त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याचा घणाघातही त्यांनी केला. नाफेडच्या केंद्रांना केवळ १५ मार्चपर्यंत तूर खरेदी करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे. त्यांना न्याय देण्याची मागणी सभापतींनी केली.
या आंदोलनात कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, मारेगावचे नरेंद्र ठाकरे, यवतमाळचे रवींद्र ढोक, बाभूळगावचे नरेंद्र कोंबे, आर्णीचे राजेश पाटील, घाटंजी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, पणनचे संचालक सुरेश चिंचोळकर, मसंद्र घुरडे, अरूणा खंडाळकर, छायाताई शिर्के, दिनेश गुल्हाने, अमोल कापसे, शाम जगताप, समीर घारफळकर, अनिल गायकवाड आदी सहभागी झाले. (शहर वार्ताहर)

शेतकऱ्यांच्याच पोत्यात तूर खरेदी करावी
गोंदिया व भंडारा येथील शासकीय केंद्रांवर नाफेडचे पोते पडून आहे. ते येथे आणावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या पोत्यातच तूर खरेदी करावी, अशी मागणी बाजार समिती सभापतींनी केली. ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना झिरो टक्के व्याज आकारणी होते. मात्र तुरीचा चुकारा मिळत नसल्याने शेतकऱ्याना कर्जाचे परतफेड करणे अशक्य झाले आहे. त्यातच बँकांनी वसुलीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कर्ज परतफेडीची मुदत वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दान्यापर्यंत तूर खरेदीचे आश्वासन पाळावे, तत्काळ चुकारे द्यावे, बारदाना व जागेचा प्रश्न दोन दिवसात सोडवावा, असा अल्टीमेटमही देण्यात आला.
 

Web Title: Speakers wearing glasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.