एसपींनी घेतला एलसीबीचा ‘क्लास’
By Admin | Updated: June 19, 2015 02:02 IST2015-06-19T02:02:44+5:302015-06-19T02:02:44+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुरुवारी डिटेक्शनच्या दृष्टीने जिल्ह्यात अत्यंत महत्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतील....

एसपींनी घेतला एलसीबीचा ‘क्लास’
‘डिटेक्शन’च्या टिप्स : अवैध धंदे बंद करा, चुकीची कामे करू नका
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी गुरुवारी डिटेक्शनच्या दृष्टीने जिल्ह्यात अत्यंत महत्वाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ‘क्लास’ घेतला.
शहरातील बोरेले ले-आऊटमध्ये बुधवारी रात्री आठ लाखांची घरफोडी झाली. त्याच दिवशी धामणगाव रोडवर भरदिवसा सव्वा लाखांचे मंगळसूत्र लुटले गेले. बसस्थानकावर बॅगला चिरा मारुन रक्कम पळविली. नुकताच पुसदमध्ये दहा लाखांचा सशस्त्र दरोडा पडला. एका पाठोपाठ या घटना घडत असताना त्या उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणा सातत्याने अपयशी ठरत आहे. याबाबतचे ‘डिटेक्शन’वर चिंता व्यक्त करणारे वृत्त ‘लोकमत’मधून उमटताच अखिलेशकुमार सिंह यांनी गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि अधिनस्त विविध पथकांच्या प्रमुखांचा आपल्या कक्षात बोलावून क्लास घेतला. एलसीबी ही ‘डिटेक्शन’च्या दृष्टीने वेगळे महत्व असलेली शाखा असल्याने डिटेक्शन वाढविण्याचे निर्देश दिले गेले. कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे चालणार नाही याचा पुनरूच्चार सिंह यांनी करताना चुकीचे काम होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ‘एलसीबी ही थेट एसपींची ब्रँच म्हणून ओळखली जाते’ असे सांगून सिंह यांनी उपस्थित पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना डिटेक्शनबाबत गंभीर राहण्याचे सुचित केले. यावेळी या कर्मचाऱ्यांना तपासाबाबत आणि गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आपल्या अनुभवातून एसपींनी काही टिप्स्ही दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिनस्त सहायक निरीक्षक कडू, पुंडगे, लष्करे, पतिंगे व फौजदार वाटाणे यांच्या नेतृत्वात पथके कार्यरत आहेत. या पथकांना गती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बंदोबस्ताची जबाबदारी नसलेल्या एलसीबीकडून नियमित डिटेक्शन अपेक्षित आहे. मात्र पाहिजे त्या गतीने ते होताना दिसत नाही. आजच्या घडीला या शाखेकडे सुमारे पाऊणशे गुन्ह्यांचा तपास असल्याचे सांगितले जाते. हा आकडा कमी दिसावा म्हणून एक ते दीड वर्षांपासून प्रलंबित प्रकरणात ए फायनल पाठवून फाईली निकाली काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)