सोयाबीन बियाणे सौदे-बुकींग उलाढाल कोट्यवधीत; यवतमाळ जिल्ह्यात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:34 AM2020-06-05T11:34:01+5:302020-06-05T11:36:34+5:30

एकीकडे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.

Soybean seed deals-booking turnover in billions; Artificial scarcity in Yavatmal district | सोयाबीन बियाणे सौदे-बुकींग उलाढाल कोट्यवधीत; यवतमाळ जिल्ह्यात कृत्रिम टंचाई

सोयाबीन बियाणे सौदे-बुकींग उलाढाल कोट्यवधीत; यवतमाळ जिल्ह्यात कृत्रिम टंचाई

Next
ठळक मुद्देमाल परस्पर जातो दुसऱ्या जिल्ह्यांमध्येशेतकऱ्यांवर घरचे बियाणे पेरण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रमुख वितरकांकडून सोयाबीन बियाण्यांच्या थेट कंपन्यांशी होणाऱ्या सौदे व बुकींगमध्येच कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ केली जाते. एकीकडे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, महागड्या दराने ते खरेदी करावे लागते तर दुसरीकडे सोयाबीन बियाणे कंपनीच्या गोदामांमधून थेट दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये नेऊन विकले जात आहे.
यवतमाळातील सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांनी शेतकऱ्यांची लूट चालविली आहे. एवढेच नव्हे तर ‘रिटेलर’लाही (किरकोळ विक्रेते) मागणीच्या अर्धाच आणि तोही जादा दराने पुरवठा केला जात आहे. त्यातूनच या वितरकांच्या दरवर्षी चालणाऱ्या बियाण्यांच्या खरेदी-विक्री व्यवसायातील एकूणच ‘गौडबंगाल’ पुराव्यानिशी पुढे आले आहे. वितरक बियाणे कंपन्यांशी चार महिने आधीच सौदे करतात. त्यात एक हजार ते पाच हजार बॅगपर्यंत सौदे केले जातात. त्याचे ५० टक्के पेमेंटही लगेच दिले जाते. परंतु या सौद्याची ‘एमआरपी’ किती असावी हे वितरक निश्चित करतो. उर्वरित पैसे संपूर्ण माल प्राप्त झाल्यानंतर दिले जातात. यात प्रत्येक बॅगवर किमान ५०० ते ७०० रुपये मार्जीन वितरक निश्चित करतो व त्या पद्धतीनेच एमआरपी बॅगवर नोंदविली जाते.
याशिवाय बियाण्यांचे बुकींग कंपनीकडे केले जाते. यात कंपनी दर निश्चित करते, मालाचा पुरवठाही कंपनीच्या सोईने होतो. यात बरेचदा कंपन्यांची मनमानी चालते. मागणीच्या ४० ते ६० टक्केच पुरवठा केला जातो. विशेष असे, बुकींग व सौद्यासाठी बहुतांश पैसा हा रिटेलरकडून उभा केला जातो. त्यात प्रमुख वितरकाची गुंतवणूक नाममात्र असते.
सौदे व बुकींगच्या बियाण्यांची बरीच विल्हेवाट मात्र दुसऱ्या जिल्ह्यात लावली जाते. यवतमाळचे वितरक हिंगणघाट, चंद्रपूर, वर्धा, सोलापूर, नांदेड, हिंगोली, परभणी, दर्यापूर, कोपरगावपर्यंत बियाण्यांचा पुरवठा करतात. थेट कंपनीतूनच हा माल त्या-त्या जिल्ह्यात पाठविला जातो. पैसा मात्र यवतमाळच्या वितरकाकडे येतो. हा वितरक मग हा पैसा वापरुन तीन महिने विलंबाने बिल बनवितो. दुसऱ्या जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांचा माल पाठविता यावा यासाठी स्थानिक पातळीवर कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. रिटेलरला मागणीच्या अर्धा आणि तोही जादा दरात पुरवठा केला जातो. थेट शेतकरी आल्यास त्यालाही ५०० ते ७०० ची मार्जीन ठेऊन दर सांगितला जातो. टंचाई व त्यातून दर वाढल्याने आता शेतकऱ्यांवर उत्पादन क्षमता कमी असलेले घरचे बियाणे पेरण्याची वेळ आली आहे.

धामणगाव-पांढरकवडा रोड गोदामात साठा
यवतमाळचे सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवर मोठी गोदामे असून तेथेच मोठा साठा आहे. तर दुसरीकडे कंपनीकडून अलॉटमेंट आलेच नाही, यावर्षी लॉकडाऊनमुळे कंपन्या पैश्यासाठी साईड देत नाहीत असे सांगून रिटेलर व शेतकऱ्यांसाठी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. अनेक ठिकाणी जिनिंगमधील गोदामात सोयाबीनचा साठा केला गेला आहे. पांढरकवडा रोडवर मोठ्या १६ गोदामांमध्ये हा साठा आहे. १६ टनच्या एका ट्रकमध्ये ५३३ बॅग भरुन हा माल रवाना केला जाणार आहे.

साठा हलविणार, जिल्हा प्रशासनाला हुलकावणी
‘सोयाबीन बियाणे विक्रेत्यांची गोदामेच तपासा ना’ असे आव्हान ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्तामधून जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यामुळे हादरलेल्या प्रमुख वितरकांनी गोदामांमधील माल हलविण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजता धामणगाव रोड व पांढरकवडा रोडवरील गोदामांवर ट्रक लावून हा माल दुसरीकडे हलविण्याचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. या माध्यमातून जिल्हा प्रशासनालाही हुलकावणी देण्याचा बियाणे विक्रेत्यांचा प्रयत्न आहे.

 

Web Title: Soybean seed deals-booking turnover in billions; Artificial scarcity in Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती