सोयाबीन बियाणे विक्रेता निघाला ‘मास्टर मार्इंड’
By Admin | Updated: May 30, 2015 02:28 IST2015-05-30T02:28:26+5:302015-05-30T02:28:26+5:30
एरव्ही केवळ अनधिकृतचा संशय आला तरी बियाणे-खते व कीटकनाशकांचा साठा जप्त करणाऱ्या कृषी खात्याला महागाव तालुक्यातील एका मास्टर मार्इंड..

सोयाबीन बियाणे विक्रेता निघाला ‘मास्टर मार्इंड’
कारवाईला जागाच नाही : कृषी खात्याने हात टेकले, कायदेशीर पळवाटांचा अभ्यास, पथक रिकाम्या हाताने परतले
यवतमाळ : एरव्ही केवळ अनधिकृतचा संशय आला तरी बियाणे-खते व कीटकनाशकांचा साठा जप्त करणाऱ्या कृषी खात्याला महागाव तालुक्यातील एका मास्टर मार्इंड बियाणे विक्रेत्याने चांगलेच जेरीस आणले आहे. कायदेशीर कारवाईचा कोणताही मार्ग सापडत नसल्याने या विक्रेत्यापुढे कृषी खात्याने अखेर हात टेकले.
जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने २७ मार्च रोजी वृत्तपत्रात बियाणे उपलब्ध असल्याची जाहिरात दिली. एकरी ३६ क्ंिवटल सोयाबीन उत्पादनाचा दावा त्याने या जाहिरातीत केला. शिवाय संशोधित बियाणे (वाण) आणि त्यावरील मार्गदर्शन उपलब्ध असल्याचे नमूद केले. राज्यात सोयाबीनचे सरासरी अधिकाधिक उत्पादन एकरी १५ क्ंिवटल आणि पश्चिम विदर्भात आठ ते दहा क्ंिवटल असताना थेट ३६ क्ंिवटलचा दावा पाहून कृषी विभागही आश्चर्यचकित झाला.
शहानिशा करून कारवाई करण्यासाठी कृषी खात्याच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अमरावती येथील पथक गुरुवारी महागावात धडकले. यवतमाळ व महागावचे कृषी अधिकारीही या पथकासोबत होते. त्यांनी या बियाणे विक्रेत्याबाबत माहिती काढली. बोगस ग्राहकाद्वारे संपर्क करून पाहिला, तेव्हा त्याने बियाणे देण्याची तयारीही दर्शविली. तेव्हा तो २४ किलो सोयाबीन बियाण्याची एक बॅग १५० रुपयाला विकत असल्याचे आढळून आले. या विक्रीची खात्री झाली. मात्र कृषी अधिकाऱ्यांना त्याच्यावर कारवाईसाठी मार्गच सापडत नव्हता. कारण त्याने साध्या बॅगमधून बियाणे विक्री केली. त्यावर कुण्या कंपनीचे नाव अथवा एमआरपी नमूद नव्हती. पर्यायाने त्याला बियाणे विक्रीचा परवाना घेणेही बंधनकारक नव्हते, त्याच्या विरोधात थेट कुण्या शेतकऱ्याने रितसर तक्रार दाखल केली नव्हती किंवा त्याच्याबाबत फसवणूक झाल्याचे सांगणारेही कुणी पुढे आले नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या कलमान्वये कारवाई करावी याचा पेच निर्माण झाला. सिडस् कंट्रोल अॅक्स, इसी अॅक्ट, आयपीसी यापैकी कशातही तो बसत नव्हता. उलट कृषी खातेच शेतकऱ्यांना घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला देते, त्यानुसारच आपण घरगुती बियाण्याची गावातील शेतकऱ्यांना विक्री करीत असल्याचे या मास्टर मार्इंड विक्रेत्याने फोनवर सांगून कृषी अधिकाऱ्यांचीच फिरकी घेतली.
त्यातच महागाव पोलिसांनीही या बियाणे विक्रेत्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितल्याने कारवाईसाठी गेलेल्या कृषी अधिकाऱ्यांना आणखीणच हुडहुडी भरली. कारण या विक्रेत्याचा भाऊ महागाव पोलिसांच्या रेकॉर्डवर हिस्ट्रीशिटर म्हणून नोंद आहे. भक्कम पुरावे आणि कायदेशीर तरतूद असेल तरच कारवाईची भूमिका घ्या असा सल्ला पोलिसांनी दिला. मात्र प्रत्यक्षात कारवाईचा मार्ग सापडत नसल्याने आणि कारवाई केल्यास ती आपल्यावरच उलटण्याची चिन्हे पाहता अखेर या पथकानेही त्या बियाणे विक्रेत्याचा माग सोडून परत येणे पसंत केले. संपूर्ण दिवस महागावात घालवूनही या पथकाला कारवाई करणे शक्य झाले नाही. या पथकाला एवढ्या वर्षात पहिल्यांदाच हा मास्टर मार्इंड बियाणे विक्रेता मिळाला असावा. (जिल्हा प्रतिनिधी)