सोयाबीन, कपाशीने पोळलेले शेतकरी वळले उसाकडे
By Admin | Updated: February 23, 2015 00:12 IST2015-02-23T00:12:37+5:302015-02-23T00:12:37+5:30
निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, कपाशीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळत आहे. यंदा पुसद उपविभागात लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली...

सोयाबीन, कपाशीने पोळलेले शेतकरी वळले उसाकडे
रितेश पुरोहित महागाव
निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीन, कपाशीमुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळत आहे. यंदा पुसद उपविभागात लागवड क्षेत्रात दुप्पट वाढ झाली असून पाच हजार हेक्टर नवीन आणि चार हेक्टर खोडवा असा नऊ हजार हेक्टर उसाची लागवड झाली आहे. मात्र साखर कारखान्यांची क्षमता अपुरी असल्याने पुढल्या वर्षी ऊस विक्रीचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहणार आहे.
पुसद आणि उमरखेड उपविभागात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी उसाची लागवड करीत आहे. वसंत सहकारी साखर कारखाना आणि सुधाकर नाईक सहकारी साखर कारखान्यामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र काही वर्षातच गुंज येथील सुधाकरराव नाईक साखर कारखाना बंद पडला. एकमेव पोफाळीच्या कारखान्याला ऊस द्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाकडे पाठ फिरविली होती. परंतु गेल्या तीन-चार वर्षात सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कपाशी आणि सोयाबीन दरवर्षी दगा देत आहे. यातून शेतकरी कर्जबाजारी होत आहे. परिणामी पुन्हा महागाव, पुसद आणि उमरखेड तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळला आहे.
यावर्षी नऊ हजार हेक्टरवर या तीन तालुक्यात उसाची लागवड झाली आहे. त्यात चार हजार हेक्टर खोडवा आणि पाच हजार हेक्टर नवीन ऊस आहे. वसंत साखर कारखान्याने आतापर्यंत यापरिसरातील ऊस मोठ्या प्रमाणात उचलला आहे. या कारखान्याची गाळप क्षमता चार लाख हेक्टरची आहे. परंतु आतापर्यंत केवळ एक लाख ९० हजार मेट्रीक टनाचे गाळप यंदा झाले आहे. पुसद महागाव आणि उमरखेड परिसरात ४०० हेक्टरवर सध्या ऊस उभा आहे. पुढल्या वर्षी क्षेत्र वाढल्याने मोठ्या प्रमाणात ऊस शेतातच उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे.