तालुक्यातील पेरणी सापडली धोक्यात
By Admin | Updated: July 9, 2015 02:38 IST2015-07-09T02:38:48+5:302015-07-09T02:38:48+5:30
पावसाने डोळे वटारल्यामुळे उमरखेड तालुक्यातील हजारों हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहे.

तालुक्यातील पेरणी सापडली धोक्यात
पावसाने वटारले डोळे : मुलांनी काढली पाण्यासाठी धोंडी, आता केवळ प्रार्थना
उमरखेड : पावसाने डोळे वटारल्यामुळे उमरखेड तालुक्यातील हजारों हेक्टर जमिनीतील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-दिन दिवसांपासून तालुक्यात लहान मुले धोंडी-धोंडी पाणी दे म्हणत फिरत आहे.
मृग नक्षत्रात पुरेसा पाऊस झाला नसला तरी देखील तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. तालुक्यात कपाशी व सोयाबीनची सर्वाधिक लागवड आहे. पेरणी नंतर पाऊस येईलच अशी अपेक्षा होती, परंतु कपाशीच्या बियाण्याला अंकुर फुटल्यानंतर त्यावर पाऊस झालाच नाही. परिणामी शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशीच्या बियाण्यांचे अंकुर करपून गेले आहेत. मृग नक्षत्रात हमखास पाऊस बरसतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या.
महागडे कपाशीचे बियाणे शेतात रोवण्यात आले. ज्यांच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी स्प्रिंकलरव्दारा ओलित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या वीज भारनियमनामुळे अनेकांना पाणी असूनही ओलित करता आले नाही. मृग संपल्यानंतरसुद्धा पाऊस न आल्यामुळे महागडे बियाणे नष्ट झाले आहे.
मृग नक्षत्र संपल्यानंतर तरी पाऊस येईल अशी आशा होती, परंतु ती फोल ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही. त्यामुळे बळीराजा आकाशाकडे टक लावून बसला आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न आल्यास शेतातील पिके करपण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे वरूणराजाकडे प्रार्थना केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्यास शेतकऱ्यांपुढे शिल्लक नाही.
(शहर प्रतिनिधी)