जिल्ह्यात ३० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी
By Admin | Updated: June 17, 2017 01:20 IST2017-06-17T01:20:49+5:302017-06-17T01:20:49+5:30
मृग नक्षत्रातील पाऊस बरसताच जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेग आला आहे. शुक्रवारपर्यंत ३० हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.

जिल्ह्यात ३० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी
कापूस क्षेत्र वाढणार : भाव न मिळाल्याने तुरीचा पेरा घटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मृग नक्षत्रातील पाऊस बरसताच जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेग आला आहे. शुक्रवारपर्यंत ३० हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. यामध्ये कापसाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. तर तुरीच्या क्षेत्रात मोठी घट नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. शेतमालास दरच न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीचा पेरा क मी केला आहे. तर कपाशीच्या पेऱ्यात वाढ नोंदविली आहे. मूग आणि उडीदाचा पेरा स्थिर आहे. सध्याच्या स्थितीत ३० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक पेरा कपाशीचा आहे. कपाशीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात २६ मिमी पाऊस
गत २४ तासात सर्वाधिक ६४ मिमी पावसाची नोंद नेर तालुक्यात करण्यात आली. यवतमाळ १६ मिमी, बाभूळगाव ३९, कळंब ३२, आर्णी ३९, दारव्हा ५५, दिग्रस ५६, पुसद ३६, उमरखेड १९, महागाव २९, केळापूर ५, घाटंजी २८, राळेगाव ८, वणी ९, मारेगाव २ आणि झरीमध्ये १ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सरासरी २६.४ मिमी पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यात पेरणीला वेग आला असून शेत शिवार फुलले आहे.