मृगाच्या पावसाने पेरणी सुरू

By Admin | Updated: June 12, 2017 02:03 IST2017-06-12T02:03:28+5:302017-06-12T02:03:28+5:30

बहुप्रतीक्षित मृग नक्षत्राच्या जलधारांनी धरतीला चिंब भिजविले आणि शेतकरी पेरणीच्या कामाला लागला.

Sowing begins with the rains | मृगाच्या पावसाने पेरणी सुरू

मृगाच्या पावसाने पेरणी सुरू

मान्सूनची प्रतीक्षा : पुसदमध्ये दोन दिवसांत ७१ मिमी, महागावातही हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव/उमरखेड : बहुप्रतीक्षित मृग नक्षत्राच्या जलधारांनी धरतीला चिंब भिजविले आणि शेतकरी पेरणीच्या कामाला लागला. महागाव आणि उमरखेड तालुक्यात दोन दिवसात समाधानकारक पाऊस कोसळल्याने शेतकरी शेतशिवारात पेरणी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याने विदर्भात मान्सूनच्या जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
गत काही वर्षांपासून दुष्काळ आणि नापिकीने शेतकरी त्रस्त झाला आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी आनंदीत झाला. त्यातच केरळ मार्गे मान्सून कोकण किनारपट्टीत दाखल झाला. लवकरच विदर्भातही दमदार पावसाला प्रारंभ होण्याची चिन्हे आहे. अशातच गत गुरुवारपासून पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस तालुक्यात मृगनक्षत्राचा पाऊस बरसला. या आशादायक पावसाने शेतात पेरणीची कामे सुरू झाली. बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी शेतात कपाशीसाठी फुल्या पाडण्याचे काम सुरू केले आहे. महागाव तालुक्यात तर बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीच्या टोबणीलाही प्रारंभ केला आहे. शेतशिवारात लगबग वाढली असून दमदार पावसाकडे शेतकऱ्यांची नजर लागल्याचे दिसत आहे.

उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुसद : तालुक्यात गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर शुक्रवारी रात्रीही पाऊस झाला. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त पुसदकरांना काहीसा दिलासा मिळाला. दोन दिवसात ७१ मिमी पावसाची नोंद झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची तेवढी प्रतीक्षा आहे. गरुवारी मृग नक्षत्राच्या दिवशी रात्री उशिरा तीन तास जारेदार पाऊस झाला. गुरूवारी ५५ मिमी पाऊस झाला तर शुक्रवारी रात्री ८.३० वाजता पावसाला सुरूवात झाली आणि दोन तास पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. १६ मीमि एवढा पाऊस झाला. दोन दिवसात ७१ मिमी पावसाची नोंद तालुक्यात झाली.

Web Title: Sowing begins with the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.