Sorghum procurement centers have not been opened | ज्वारी खरेदीची केंद्रे उघडलीच नाहीत

ज्वारी खरेदीची केंद्रे उघडलीच नाहीत

ठळक मुद्देमुदत संपली : आता व्यापाऱ्यांची ज्वारी शेतकऱ्यांच्या नावाने येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासनाने शेतकऱ्यांची ज्वारी १५ जूनपर्यंत खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु प्रत्यक्षात ही मुदत जावून तीन आठवडे लोटूनही ही खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. त्यामुळे बहुतांश ज्वारी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकली. तर काही ज्वारी शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आता व्यापाऱ्यांची हीच ज्वारी शेतकऱ्यांच्या नावावर शासनाला हमीभावानुसार विकली जाण्याची दाट शक्यता आहे.
ज्वारी व मका मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरेदी केला जातो. खरेदी-विक्री संघ ही फेडरेशनची सबएजंट आहे. जिल्ह्यात मक्याचे फार क्षेत्र नाही. ज्वारीची खरेदी केंद्रे ११ मे रोजी सुरू करून १५ जूनपर्यंत ही खरेदी संपविण्याचे आदेश होते. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, वणी आणि झरी या सात खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. संबंधित खरेदी-विक्री संघांमध्ये ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची ऑफलाईन नोंदणी केली गेली. मात्र प्रत्यक्ष ज्वारी खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी युझर आयडी आणि पासवर्ड फेडरेशनने नेमलेली कंपनी तयार करून मार्केटिंग फेडरेशनला पाठविते. परंतु वारंवार पत्र देऊनही हा पासवर्ड व युझर आयडी मिळाला नाही. पर्यायाने मुदत संपूनही ज्वारीची शासकीय खरेदी होऊ शकलेली नाही. संकरित ज्वारीसाठी दोन हजार ५५० रुपये प्रति क्विन्टल हमीभाव जाहीर केला आहे.
नोंदणी करूनही ज्वारी खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात माल पडून आहे. पावसाळ्यात हा माल ठेवायला जागा नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैशाची आवश्यकता आहे. शासकीय खरेदी सुरू होण्याची चिन्हे नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी बाजारात १९०० रुपये दराने ज्वारी विकावी लागत आहे.
जागेची अडचण व पैशाची आवश्यकता लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाºयांना आपली ज्वारी विकणे सुरू केले आहे. शेतकऱ्याला प्रति क्विन्टल ५०० ते ६०० रुपये कमी दराने ही ज्वारी विकावी लागत आहे. परंतु शासनाचे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर हीच ज्वारी शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारी हमीभावानुसार विकायला आणण्याची शक्यता अधिक आहे.

जिल्ह्यात ३० हजार क्ंिवटल ज्वारीचे उत्पादन
जिल्ह्यात २५ ते ३० हजार क्ंिवटल ज्वारीचे उत्पादन झाल्याचे सांगितले जात असले तरी मार्केटिंग फेडरेशनने मात्र हा आकडा दहा हजारांच्या घरात असल्याचे म्हटले आहे. त्यातही पांढरकवडा व झरी या तालुक्यात ज्वारीचे अधिक क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले.

सात ज्वारी खरेदी केंद्रे मंजूर आहेत. परंतु पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक असलेला युझर आयडी व पासवर्ड फेडरेशनकडून मिळाला नाही. त्यामुळे अद्याप खरेदी सुरू होऊ शकली नाही. या पासवर्डसाठी पाठपुरावा सुरू आहे.
- अर्चना माळवे
जिल्हा व्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशन, यवतमाळ.

Web Title: Sorghum procurement centers have not been opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.