पावसाने समाधान, प्रकल्प तहानलेलेच

By Admin | Updated: July 30, 2014 00:03 IST2014-07-30T00:03:04+5:302014-07-30T00:03:04+5:30

जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते.

Solving the rain, the project thirsty | पावसाने समाधान, प्रकल्प तहानलेलेच

पावसाने समाधान, प्रकल्प तहानलेलेच

यवतमाळ : जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते. उशिरा आलेल्या पावसाने समाधान असले तरी जलसाठ्याची स्थिती मात्र अद्यापही गंभीर आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहे. या प्रकल्पावरून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. गेल्या कित्येक वर्षात जुलै महिन्यात प्रकल्प ६० ते ७० टक्के भरतात. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रकल्पासह मध्यम आणि लघु प्रकल्पात ३० टक्केच्या आत पाणी आहे. पुसद तालुक्यातील इसापूर येथे असलेल्या ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात सध्या केवळ १८.३८ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाची क्षमता ३८८.३७ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी या प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी ३० जुलै रोजी या प्रकल्पात ८६ टक्के जलसाठा झाला होता. या प्रकल्पाचे दरवाजेही उघडावे लागले होते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी तशी स्थिती दिसत नाही.
बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात ३४.१० टक्के, दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात १४.४९ टक्के, केळापूर तालुक्यातील सायखेडा प्रकल्पात ४३.८० टक्के, दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्पात ३०.७९ टक्के, यवतमाळ तालुक्यातील वाघाडी प्रकल्पात ३०.७९ टक्के, बोरगाव प्रकल्प ३९.६३ टक्के, महागाव तालुक्यातील लोअरपूस प्रकल्पात ४९.७२ टक्के, दारव्हा तालुक्यातील अडाण प्रकल्पात ११.९४ टक्के आणि वणी तालुक्यातील नवरगाव प्रकल्पात २७.४८ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश प्रकल्प गतवर्षी ओव्हर-फ्लो झाले होते. मात्र यंदा या प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षा आहे.
यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ २७.९३ टक्के पाऊस जुलै अखेर झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २५३.७१ मिमी पाऊस कोसळला. विशेष म्हणजे गतवर्षी ३० जुलैपर्यंत जिल्ह्यात ८३५.६६ मिमी पावसाची नोंद झाली होती. आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गतवर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली होती. मात्र यंदा लांबलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचेच गणित बिघडविले आहे. पावसाचा वेग पाहता येत्या पंधरवड्यातही जलसाठ्याची स्थिती सुधारण्याची शक्यता नाही. त्यामुळे वाहुन जाणाऱ्या पाण्याचा जमिनीत निचरा करणे आवश्यक असल्याचे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Solving the rain, the project thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.