स्वानंदाच्या कार्यातूनच समाजसेवा घडते
By Admin | Updated: August 13, 2014 00:00 IST2014-08-13T00:00:21+5:302014-08-13T00:00:21+5:30
इतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील

स्वानंदाच्या कार्यातूनच समाजसेवा घडते
रवींद्र आणि स्मिता कोल्हे : ‘आम्ही बी-घडलो, तुम्ही बी-घडाना’ उपक्रम
काशीनाथ लाहोरे - यवतमाळ
इतरांना उपकृत करण्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी केलेल्या कार्यातून नकळत समाजसेवा घडते. त्यासाठी प्राणिमात्रांवर प्रेम आणि करूणा असावी लागते, असे प्रतिपादन मेळघाटातील दाम्पत्य डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी येथे केले.
‘प्रयास’ यवतमाळच्यावतीने आयोजित ‘आम्ही बी-घडलो, तुम्ही बी-घडाना’ या उपक्रमांतर्गत येथील महेश भवन येथे झालेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. भान ठेवून योजना आखाण्यात आणि बेभान होऊन काम करावे. या बाबा आमटेच्या शिकवणीनुसार काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर परतीचे दोर निग्रहाने कापून टाकावे लागतात. आज देशासाठी विचारपूर्वक जगण्याची गरज असून, सेवाभावी माणसांची मेळघाटला आजही गरज आहे.
यापुढे कुपोषितांसाठी काम करणाऱ्यांना आमची शेती हेलिपॅडसारखी उपयोगी पडणारी असेल. तरूणांनी या कामात झोकून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आपल्या शेतीचे आम्ही मालक नसून ट्रस्टी आहेत, नोकर आमचे सहकारी आहेत, या विश्वासाने आम्ही कार्य करतो म्हणून यशस्वी झालो असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. उल्हास जाजू, करूणाताई फुटाणे, शेषरावजी डोंगरे, शंकर बडे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विजय देशपांडे, उपस्थित होते. मृणालिनी चितळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिताने हसतखेळत उत्तरे दिली.
अनेक थरारक अनुभवही त्यांनी सांगितले. बैरागड सारख्या दुर्गम ठिकाणी काम करताना येणाऱ्या अडचणी चित्तथराक होत्या.
आपल्या लगनची गोष्ट स्मितातार्इंनी मनोरंजक पद्धतीने सांगून वातावरण मोकळे केले. लग्नासाठी ठेवलेल्या चार अटीत स्वधर्म दडलेला आहे, असे जाणवल्यामुळेच मी त्यांच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला असेही त्यांनी सांगितले.
स्वत:वर बेतले की माणसे तत्व बाजूला ठेवून वागतात मात्र कोल्हे परिवाराने कथनी आणि करणी यात साम्य ठेवल्याने सर्वांचा विश्वास संपादित करण्यात त्यांना यश आले असेही नम्रपणे त्यांनी सांगितले.